'...म्हणून शिवाजी महाराज आहेत,' विधानानंतर जितेंद्र आव्हाड यांचे नवे ट्वीट, प्रभु रामांचा उल्लेख करत म्हणाले, "रावण काढून..." | jitendra awhad new tweet after commenting on shivaji maharaj and aurangzeb | Loksatta

‘…म्हणून शिवाजी महाराज आहेत,’ विधानानंतर जितेंद्र आव्हाड यांचे नवे ट्वीट, प्रभु रामांचा उल्लेख करत म्हणाले, “रावण काढून…”

राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी छत्रपती शिवाजी महाराज तसेच औरंगजेबाविषयी एक विधान केले.

jitendra awhad on shivaji maharaj
जितेंद्र आव्हाड (संग्रहित फोटो)

राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी छत्रपती शिवाजी महाराज तसेच औरंगजेबाविषयी एक विधान केले. या विधानावर आक्षेप व्यक्त करण्यात येत आहे. मात्र या आक्षेपाला झुगारून आव्हाड यांनी आवाज बहुजनांचा, सन्मान महाराष्ट्राचा म्हणत एक ट्वीट केले आहे. या ट्वीटद्वारे रामायणातून रावण काढून श्रीराम समजावून सांगा, असे आव्हाड म्हणाले आहेत.

जितेंद्र आव्हाड यांच्या ट्वीटमध्ये काय आहे?

जितेंद्र आव्हाड यांनी आवाज बहुजनांचा सन्मान महाराष्ट्राचा असा हॅशटॅग देत चार ओळींचे एक ट्वीट केले आहे. या ट्वीटमध्ये त्यांनी प्रभु राम, रावण, छत्रपती शिवाजी महाराज, मुघल, आदिलशाही अशा सर्वांचा उल्लेख केला आहे. “रावण काढून रामायणातून श्रीराम समजावून सांगा. दुर्योधन, कर्ण काढून महाभारतातून कृष्ण-अर्जुन समजावून सांगा. आदिलशाही आणि मुघल बाजूला काढून श्री शिवाजी छत्रपतींचा इतिहास समजावून सांगा. इंग्रजांना बाजुला काढून भारतीय स्वातंत्र्यलढा समजावून सांगा,” असे जितेंद्र आव्हाड म्हणाले आहेत.

जितेंद्र आव्हाड यांच्या कोणत्या विधानामुळे वाद झाला?

याआधी जितेंद्र आव्हाड यांनी पुण्यात बोलताना एक विधान केले होते. या विधानावर आक्षेप घेत विरोधकांकडून त्यांच्यावर टीका केली जात आहे. “एमपीएसीमधूम महाराष्ट्राचा इतिहास हा विषयच गायब करून टाकला. एके दिवशी तावडे विधानसभेत म्हणाले की आम्ही पुस्तकातून मुघलांचा इतिहास काढून टाकणार. मग मी म्हणालो की मग शिवाजी महाराज गोट्या खेळत होते, असे दाखवणार का? समोर औरंगजेब ठेवला म्हणून शिवाजी महाराज आहेत. अफजलखान आहे म्हणून शिवाजी महाराज आहेत ना. शाहिस्तेखान आहे म्हणून शिवाजी महाराज आहेत ना. यातूनच शिवाजी महाराज राज्यकारभार कसा चालवतात हे जगासमोर आहे ना. १६६९ साली दुष्काळ होता. तेव्हा आपल्या तिजोरीचे टाळे उघडून शेतकऱ्यांमध्ये पैसे जाऊद्या, हे सांगणारे जगातील पहिले राजे शिवाजी महाराज होते,” असे जितेंद्र आव्हाड म्हणाले.

दरम्यान, जितेंद्र आव्हाड यांच्या विधानानंतर नागपूर, पुण्यात निदर्शने करण्यात आली. भाजपाच्या काही नेत्यांनी आव्हाड यांचा निषेध व्यक्त केला आहे. शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी आव्हाड यांचे मानसिक संतुलन बिघडले आहे, असे म्हणत टीका केली आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 05-02-2023 at 17:23 IST
Next Story
ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांना जीवे मारण्याची धमकी; म्हणाले, “राणे कुटुंबाविरोधात…”