scorecardresearch

#Forgiveher म्हणत कंगना रणौतच्या ‘त्या’ विधानावर जितेंद्र आव्हाडांची प्रतिक्रिया; ट्वीट करत म्हणाले,…

कंगनाने यावेळी महात्मा गांधींवर निशाणा साधला असून महात्मा गांधींना सत्तेची भूक होती असं म्हटलं आहे.

Jitendra-awhad-tweet
राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी कंगना रणौतला उद्देशून ट्वीट केलं आहे.

अभिनेत्री कंगना रणौत आणि वादविवाद हे जणू आता समीकरणच बनलेलं आहे. एका वक्तव्यासंदर्भात वाद मिटतो न् मिटतो तोच आता तिच्या आणखी एका वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. कंगनाने यावेळी महात्मा गांधींवर निशाणा साधला असून महात्मा गांधींना सत्तेची भूक होती असं म्हटलं आहे. तिच्या याच विधानावरुन अनेक नेत्यांनी तिच्यावर टीका केली आहे. राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनीही तिला उद्देशून ट्वीट केलं आहे.

आपल्या ट्वीटमधून तिला माफ करण्यासही सांगितलं आहे. जितेंद्र आव्हाड म्हणतात, गांधी हम शरमिंदा है, तेरे कातिल जिंदा है…#MahatmaGandhi #forgiveher.

तर आव्हाडांप्रमाणेच अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनीही या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. बापू एक व्यक्ती नाहीत तर विचार आहेत. बापूंची हत्या केली असली तरी विचार नष्ट करता येणार नाहीत. त्यांच्या हत्येचा कट रचणारे लोकही त्यांचे विचार कधीच संपवू शकणार नाहीत. आम्हाला वाटतं महात्मा गांधींबद्दल केली जाणारी ही विधानं देश, जग स्वीकारणार नाही, असं मलिक म्हणाले आहेत.

काय म्हणाली आहे कंगना रणौत?

कंगनाने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एका बातमीचा स्क्रीनशॉट शेअर केला आहे. ‘गांधी आणि इतर नेताजींना सोपवण्यास तयार झाले होते’ अशी या बातमीची हेडलाइन आहे. या रिपोर्टमध्ये महात्मा गांधींसोबत जवाहरलाल नेहरु तसंच मोहम्मद अली जिन्ना यांनी एका ब्रिटीश न्यायाधीशांसोबत सुभाषचंद्र बोस देशात आल्यानंतर त्यांना सोपवण्यात येईल असा करार केल्याचा दावा आहे.

‘तुम्ही गांधींचे चाहते असू शकता किंवा नेताजींचे समर्थक, तुम्ही दोन्ही भूमिका घेऊ शकत नाही. निवडा आणि निर्णय घ्या’ असं या बातमीवर लिहिण्यात आलं आहे.

स्वातंत्र्यसैनिकांना त्या लोकांनी ब्रिटीशांच्या हवाली केलं ज्यांच्यामध्ये लढण्याची हिंमत नव्हती, मात्र सत्तेची भूक होती असंही कंगनाने म्हटलं आहे. पुढे बोलताना कंगनाने महात्मा गांधींवर निशाणा साधत म्हटलं आहे की, “हे तेच लोक आहेत ज्यांनी आपल्याला कोणी एक कानाखाली मारली तर दुसरा गाल पुढे करा आणि अशाप्रकारे आपल्याला स्वातंत्र्य मिळेल अशी शिकवण दिली. अशाप्रकारे स्वातंत्र्य नाही तर भीक मिळते. आपले हिरो हुशारीने निवडा”.

“महात्मा गांधींनी कधीही भगतसिंग किंवा नेताजींना पाठिंबा दिला नाही. भगतसिंग यांना फाशी व्हावी अशी महात्मा गांधींची इच्छा होती असे काही पुरावे दर्शवतात. त्यामुळे तुम्ही तुमचे हिरो योग्यपणे निवडले पाहिजे. कारण या सर्वांना तुमच्या आठवणींच्या एकाच बॉक्समध्ये ठेवणं आणि प्रत्येक वर्षी जयंतीला शुभेच्छा देणं पुरेसं नसून खरंतर मूर्खपणा, बेजबाबदारपणा आहे. प्रत्येकाला आपला इतिहास आणि आपले हिरो माहिती असायला हवेत”, असंही कंगनाने पोस्टमध्ये म्हटलं आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 17-11-2021 at 12:58 IST

संबंधित बातम्या