Jitendra Awhad On On NCP Alliance : अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विलिनीकरणाच्या चर्चा सुरू आहेत. याबाबत शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून अजित पवारांना दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण हवं होतं अशी भूमिका मांडली जात आहे, तर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाकडून त्याबाबत कोणतीही स्पष्ट भूमिका घेतली जात नसल्याचं चित्र आहे.

दरम्यान, दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चांवरून आता राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी यू-टर्न घेतला आहे. ‘सगळं व्यवस्थित होईल’ असं अजित पवार आपल्याशी बोलताना म्हणाले होते, असं वक्तव्य जितेंद्र आव्हाड यांनी केलं होतं. मात्र, आव्हाडांनी आता त्यांच्याच वक्तव्यावरून यू-टर्न घेतला. आज माध्यमांशी बोलताना आव्हाड यांनी म्हटलं की, “विलिनीकरणाच्या कुठल्याही चर्चेत मी नव्हतो आणि विलिनीकरणाबाबत मला काहीही माहिती नाही.”

जितेंद्र आव्हाड काय म्हणाले?

“मी तुम्हाला स्पष्ट सांगतो की दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या कुठल्याही चर्चेत मला सहभागी करून घेतलं नव्हतं. मी त्याचा भाग नव्हतो. त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबाबत मला काहीही माहिती नाही. त्यामुळे माझं हे वक्तव्य आपण स्पष्टपणे टिव्हीवर दाखवावं. दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या कुठल्याही बैठकीत मी सहभागी नसायचो. मला त्याबाबत कुठलीही माहिती देण्यात आलेली नाही. त्यामुळे मला दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबाबत काहीही माहिती नाही”, असं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे.

जितेंद्र आव्हाडांनी काय वक्तव्य केलं होतं?

दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चांबाबत बोलताना जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं होतं की, “दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबाबत अजित पवार यांनी पुढाकार घेतला होता. त्यांचं (अजित पवार यांचं) आणि माझं शेवटचं जे संभाषण झालं होतं ते, खरं तर मी या विषयावर आतापर्यंत बोललो नव्हतो आणि मला यावर जास्त बोलायचं देखील नाही. पण अजित पवार मला म्हणाले होते की जितेंद्र माझ्यावर विश्वास ठेव, सगळं व्यवस्थित होईल. हे त्यांचं आणि माझं शेवटचं संभाषण होतं”, असं जितेंद्र आव्हाड काही दिवसांपूर्वी म्हणाले होते.

‘अजित पवारांच्या विमानात बॉम्ब होता का?’, खासदार बजरंग सोनवणेंनी व्यक्त केली शंका

“सीसीटीव्ही फुटेजमध्ये काय दिसतंय तुम्ही पाहा. काय दिसतंय? विमान खाली जमीनीला टच होऊन मग क्रॅश झालं नाही. मला जेवढं कळतंय, विमान खाली येताना तिरकं झालं, पण जमीनीला टच होण्याआधीच विमानाचा ब्लास्ट झाला. कारण त्या ब्लास्टमध्ये देखील विमानाचा पुढचा जो भाग आहे तेथील लोक बाहेर फेकले गेले आणि त्यानंतर विमान जमीनीला टच होऊन स्फोट झाला, म्हणजे ही घटना काय असू शकते? याबाबत संशय नाही का? का त्यात बॉम्ब होता? का विमानाच्या इंजिनाचा ब्लास्ट झाला?”, अशी शंका उपस्थित करत बजरंग सोनवणे यांनी वेगवेगळे सवाल उपस्थित केले आहेत.