राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड आणि ठाणे महापालिकेचे सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांच्यात मागील काही दिवसांपासून वाद सुरू आहे. अलीकडेच महेश आहेर यांनी आपल्या मुलीला जीवे मारण्याचा कट रचला, असा गौप्यस्फोट जितेंद्र आव्हाड यांनी केला होता. या कटाची पुष्टी करणारे काही ऑडिओ रेकॉर्डिंगही जितेंद्र आव्हाडांनी शेअर केले होते. यानंतर आता जितेंद्र आव्हाडांनी आणखी एक गौप्यस्फोट केला.
सध्याचे ठाणे महापालिकेचे सहाय्यक आयुक्त महेश आहेर हे मुळात उप कार्यालयीन अधिक्षक आहेत, असं असूनही त्यांची सहाय्यक आयुक्त पदावर नेमणूक करण्यात आली, असा गौप्यस्फोट जितेंद्र आव्हाडांनी केला. प्रशासनातील कुठल्या महाभागाने महेश आहेर यांची फाईल फुटअप केली? असा सवालही जितेंद्र आव्हाडांनी विचारला. त्यांनी ट्वीट करत हा गौप्यस्फोट केला आहे.
हेही वाचा- “मी अपघाताने राजकारणात आलो”, सध्याच्या राजकीय स्थितीवर राज ठाकरेंचं भाष्य
जितेंद्र आव्हाड ट्विटमध्ये म्हणाले, “महेश आहेरकडे सहाय्यक आयुक्त पदाचा पदभार सोपवला आहे. मुळात ते उप कार्यालयीन अधिक्षक आहेत. प्रशासनातील कुठल्या महाभागाने ही फाईल फुटअप केली? ज्यामुळे उप कार्यालयीन अधिक्षक हा थेट सहाय्यक आयुक्ताचा कार्यभार सांभाळत आहेत. तेही पाच वर्षांपासून. ठाणे महानगरपालिका आयुक्त अभिजीत बांगर हे तरुण आहेत. माझ्या माहितीप्रमाणे सर्व्हिस रुल्सचे पुस्तक त्यांनी वाचले असेल. आपण एखाद्याला तात्पुरता पदभार किती वर्षे देऊ शकतो? हे कुठल्या सर्व्हिस रुल्सच्या कायद्यामध्ये बसतं? याबाबत काही नियम आहेत की नाहीत? ठाणे महानगरपालिकेने सगळेच नियम धाब्यावर बसवले आहेत.”
“महेश आहेर याला आधी मूळ अधिकार पदावर आणा. ते उप कार्यालयीन अधिक्षक आहेत. त्यानंतर आपण बाकीचे सगळं बोलू. ठाणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी तेवढं तरी करावं की पैशाने हात बरबटल्यामुळे महापालिकेचे खालचे अधिकारी काहीच करायला तयार नाहीत?” असा सवालही जितेंद्र आव्हाडांनी विचारला. या ट्विटमध्ये त्यांनी ठाणे महानगरपालिकेचं खातंही टॅग केलं आहे.