scorecardresearch

जितेंद्र आव्हाडांचा रील बनवणाऱ्या निलंबित महिला कंडक्टरला पाठिंबा, म्हणाले, “उच्चभ्रू…”

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी रील केलं म्हणून निलंबित केलेल्या महिला वाहकावरील कारवाईला विरोध केलाय.

जितेंद्र आव्हाडांचा रील बनवणाऱ्या निलंबित महिला कंडक्टरला पाठिंबा, म्हणाले, “उच्चभ्रू…”
जितेंद्र आव्हाड

महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या एका महिला वाहकाने (कंडक्टर) गणवेशात असताना रील केला आणि तो व्हायरल झाल्यावर एसटी महामंडळाने या महिला वाहकाला निलंबित केलं. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी या महिलेवरील कारवाईला विरोध केलाय. तसेच महिला वाहकाला त्वरित नोकरीवर रुजू करून घेतलं नाही, तर आमच्या महिला पदाधिकारी तिच्या पाठिशी उभ्या राहतील,असा इशारा दिला. ते मंगळवारी (४ ऑक्टोबर) ठाण्यात बोलत होते.

जितेंद्र आव्हाड म्हणाले, “एका व्हिडीओवरून महिला वाहकावर निलंबनाची कारवाई करण्यात आली. यात मला वर्ग संघर्षाचा वास येत आहे. उच्चभ्रू सोसायटी किंवा उच्चपदस्थ अधिकाऱ्यांचे नाच गाण्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर येत असतात. त्यात त्यांचे लाखो फॉलोवर्स आहेत. मात्र, एका गरिब कंडक्टर महिलेने एक व्हिडीओ टाकला, तर तिला निलंबित केले. हा कुठला न्याय?

“ही दुर्दैवी बाब असून त्या महिलेला त्वरित नोकरीवर रुजू करून घेण्यात यावं. अन्यथा, आमच्या महिला पदाधिकारी निलंबित महिलेच्या पाठिशी उभ्या राहतील”, असा इशारा आव्हाडांनी दिला.

यावेळी जितेंद्र आव्हाड यांनी माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांना ईडी प्रकरणात मिळालेल्या जामिनावरही प्रतिक्रिया व्यक्त केली. ते म्हणाले, “अनिल देशमुखांना ११ महिन्यानंतर जामीन मिळाला. त्याचा मला आनंद होत आहे. त्यांची निर्दोष मुक्तता होईल याबाबतही आम्हाला खात्री आहे. हा सत्याचा विजय आहे.”

“स्वत:च्या जखमेवर उपचार करण्यासाठी शिवसेना सक्षम आहे,” असं म्हणत त्यांनी टीकाकारांना प्रत्युत्तर दिलं.

ठाण्यातील विकास प्रकल्पांवर बोलताना ते म्हणाले, “ठाण्यातील मोठ्या प्रकल्पांमधील एक प्रकल्प असलेला कळवा खाडीवरील तिसरा पूल चांगलाच चर्चेत आला आहे. जवळपास ९० टक्क्याहून अधिक कामं पूर्ण झालेला हा पूल वाहतुकीसाठी कधी खुला करणार आहे? ठाणे महानगर पालिकेकडून हा पूल सुरू करण्यासाठी वारंवार मुदत देण्यात आल्या होत्या. मात्,र आता सगळ्या मुदती संपल्या आहेत.”

“राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ठाण्याचे आहेत आणि त्यांनी लवकरात लवकर या पुलाचे उद्घाटन करावं,” अशी मागणी जितेंद्र आव्हाडांनी केली. आज ठाण्यातील तिसऱ्या मोठ्या कळवा पुलाच्या पाहणीसाठी आव्हाडांनी हजेरी लावली.

हेही वाचा : “त्याने अनेक वर्षे लहान मुलीवर बलात्कार केला, अजूनही…”, जितेंद्र आव्हाडांचा भाजपा पदाधिकाऱ्यावर गंभीर आरोप

यावेळी आव्हाडांनी सांगितले की, मी या पुलाच्या उद्घाटनासाठी आलो नाही. मुख्यमंत्री ठाण्यातील आहेत आणि ठाण्यातील मोठ्या पायाभूत सुविधांपैकी हा मोठा पूल आहे. या पुलासाठी सगळ्यांची मदत आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी लवकरात लवकर या पुलाचे उद्घाटन करावे. यासाठी मी येथे आलो आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या