राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आज विधानभवन परिसरात घेतलेल्या पत्रकार परिषदेत राज्य सरकारवर हल्लाबोल केला. “महाराष्ट्राची सध्याची परिस्थिती अत्यंत नाजूक झाली आहे,” अशी चिंता व्यक्त करत त्यांनी विविध मुद्द्यांवरून भाजप आणि महायुती सरकारला धारेवर धरलं.
पायाभूत सुविधा आणि मुंबईची दुरवस्था
मुंबई महानगरपालिकेनं वेळेत झाडांची छाटणी केली नाही, तसंच पावसाळ्यापूर्वी रस्त्यांची कामे नीट झाली नसल्याचा आरोप आव्हाड यांनी केला. “विकासाच्या नावाखाली शहरांचा बलात्कार सुरू आहे. एका बाजूला मेट्रो, एका बाजूला मोनो आणि गरज नसताना रिंग रोडची कामे सुरू आहेत. लोकांची कुणालाही काळजी पडलेली नाही,” असा संताप त्यांनी व्यक्त केला.
देशात छप्पन इंची छाती आणि छप्पन इंची भ्रष्टाचार
सरकारच्या कारभारावर टीका करताना ते म्हणाले, “देशात छप्पन इंची छाती आणि छप्पन इंची भ्रष्टाचार सुरू आहे.” पुढे आरोप करताना त्यांनी सांगितले की, जे लोग भाजपाविरोधी मतदान करतात, त्यांची नावे मतदार यादीतून वगळली जात आहेत. हा लोकांचा मतदानाचा अधिकार काढून घेण्याचाच प्रकार असून, आगामी विधानसभा निवडणूक सोपी करण्यासाठी भाजपकडून ही मोहीम राबवली जात आहे. देशाची वाटचाल ब्राह्मणी व्यवस्थेकडे सुरू असल्याचा टोलाही त्यांनी लगावला.
वंचित घटकांबद्दल भीती
“धनगर, वंजारी, दलित समाजातील अनेकांची गावात हक्काची घरे नसतात. त्यामुळे त्यांची नावे यादीतून वगळली जाण्याची मोठी भीती आहे,” अशी शंका त्यांनी उपस्थित केली. तसेच, भ्रष्टाचाराच्या बाबतीत महाराष्ट्र आता बिहारच्याही पुढे गेल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रकृतीवर भाष्य
एकनाथ शिंदे यांच्या आजारपणावर बोलताना आव्हाड म्हणाले की, अतिश्रम, तणाव आणि मानसिक दबावामुळे उपमुख्यमंत्री आजारी पडले आहेत. मी स्वतः त्यांना भेटून त्यांचे दैनंदिन रुटीन बदलण्याचा, झोपायच्या वेळा पाळण्याचा आणि निसर्गाच्या विरोधात जाऊन शरीराला त्रास न देण्याचा सल्ला दिला आहे.
