Jitendra Awhad on Gautami Patil : महाराष्ट्रातील लाखो तरुणांच्या दिलों की धडकन असलेल्या गौतमी पाटीलचं चक्क जितेंद्र आव्हाड यांनी कौतुक केलंय. महाराष्ट्रातील प्रस्थापित वर्गाचा या नाचगाण्यावर पगडा होता, त्याला गौतमी पाटीलने धक्का दिला असल्याचं जितेंद्र आव्हाड म्हणाले. तसंच, गौतमी पाटीलविषयी विधानसभेत चर्चा झाली तेव्हा तिची बाजू घेणारा मी पहिला आमदार होतो, असंही ते म्हणाले. राष्ट्रवादी युवक काँग्रेस, नवी मुंबई जिल्हाध्यक्ष अन्नू आंग्रे यांनी दिघा येथे गौतमी पाटीलच्या लावणीचा कार्यक्रम आयोजित केला होता.

जितेंद्र आव्हाड म्हणाले, “गौतमी पाटीलने चांगल्या चांगल्यांना झोपवून स्वतःचं नाव केलं, त्यामुळे मला ती खूप आवडते. तिच्या नाचाबद्दल मला काही बोलायचं नाहीय. पण महाराष्ट्रातील प्रस्थापित वर्गाचा या नाचगाण्यावर पगडा होता, त्याला या मुलीने धक्का दिला. आमच्या विधानसभेतही हिच्यावर चर्चा झाली. अनेकजण तिच्याविषयी बोलले. पण मला आठवतंय मी पहिला माणूस होतो, ज्याने सांगितलं की एका गरीब घरातील मुलगी जर स्वतःच्या अदाकारीवर स्टेजवर पकड मिळवत असेल तिच्या पाठीशी उभं राहायला पाहिजे. आता ती मोठ मोठ्यांच्या मागे उभी राहते. तेव्हा ती विसरली की तिच्या मागे कोण उभं राहिलं नव्हतं.”

…तर खऱ्या अर्थाने सामाजिक न्याय मिळेल

“तुझी अदाकारी चालू ठेव. महाराष्ट्रात अनेकांना तू आवडतेस. अनेक तारकांना कुटुंबव्यवस्था नाही, अशा मुलींनी स्टेजवर कब्जा मिळवला पाहिजे तरच महाराष्ट्राला खऱ्या अर्थाने सामाजिक न्याय मिळेल”, असंही जितेंद्र आव्हाड म्हणाले.

“मी हिला आणण्यासाठी सहा महिने प्रयत्न करतोय. पण ती माझ्या कार्यक्रमाला आली नाही, अन्नूकडे आली. हिला बघण्याकरता मला अन्नूकडे यावं लागलं”, असंही जितेंद्र आव्हाड म्हणाले.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून गौतमी पाटील पुन्हा एकदा चर्चेत आहे. तिला आता विविध चॅनेल्सवरील कार्यक्रमांतही बोलावलं जातं. सन मराठी, कलर्स मराठीसह अनेक चॅनेल्सवरील कार्यक्रमात तिने तिचं नृत्य सादर करून महाराष्ट्रातील प्रेक्षकांचं मनोरंजन केलंय. काही दिवसांपूर्वी तिने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचीही भेट घेतली होती.