Jitendra Awhad on Last call with Ajit Pawar : अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाचा प्रश्न सातत्याने चर्चेत येत आहे. येत्या १२ फेब्रुवारी रोजी अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शरद पवारांची राष्ट्रवादी एकत्र येणार होती, असा खुलासा शरद पवारांनी केला. तसंच, १७ जानेवारी रोजी याबाबत अंतिम निर्णय झाला असल्याचा दावा त्या बैठकीत असलेल्या शरद पवारांच्या नेत्यांनी केला आहे. तसंच, २२ जानेवारी रोजी सिल्व्हर ओकवरही बैठक झाल्याचं म्हटलं जातंय. दरम्यान, याबाबत जितेंद्र आव्हाडांनीही प्रतिक्रिया दिली आहे. ते आज माध्यमांशी बोलत होते.

जितेंद्र आव्हाड म्हणाले, “अजित पवार मला म्हणाले होते की जितेंद्र माझ्यावर विश्वास ठेव, सर्वकाही ठीक होईल. हे त्यांचं आणि माझं शेवटचं संभाषण होतं. आता यावर लोकांना काय चर्चा करायची आहे ते करूद्यात.”

“या चर्चेपासून मी मुद्दाम लांब राहिलो आहे, मला वाद नकोय. या वादात जाण्यात काहीही अर्थ नाही. एक माणूस गेल्यावर तो काय बोलला होता, बोलला होता की नाही. ही चर्चा करणे म्हणजे नैतिकतेला धरुन नाही. मी गेले काही दिवस गप्प आहे. त्याला काही कारणं आहेत. त्यामुळे माझा बाप (शरद पवार) जो निर्णय घेईल तो मला मान्य असेल. मला काय वाटतं ते मी माझ्या मनातच ठेवीन, ते मी बाहेर काढणार नाही”, असंही जितेंद्र आव्हाड म्हणाले.

अजित पवार चुकीच्या वेळी गेले

“महाराष्ट्राच्या राजकारणात आता दादा नसतील ही जाणीवच अंगावर काटा आणणारी आहे. कामाचा प्रचंड आवाका आणि उरक असणारा हा लोकप्रिय लोकनेता नियतीने आज आपल्यापासून हिरावला. प्रत्येक ठिकाणी वेळेत जाणारे दादा आज चुकीच्या वेळी गेले…! अधिक लिहवत नाही. शब्द अपुरे आहेत आणि भावना गोठल्या आहेत. पवार कुटुंबियांच्या या दुःखद प्रसंगात आम्ही सहभागी आहोत”, असं म्हणत जितेंद्र आव्हाडांनी अजित पवारांना श्रद्धांजली वाहिली होती.

विलिनीकरणावर छगन भुजबळ काय म्हणाले?

“दोन्ही राष्ट्रवादी एकत्र यावेत अशी अनेकांची इच्छा आहे. ठाकरे एकत्र आले मग पवारही यावेत. परंतु, अशा काही चर्चा झाल्या की नाही याची कल्पना नाही. मुख्यमत्र्यांनीही सांगितलं की त्यांच्याशी अजित पवारांनी यासंदर्भात काहीही सांगितलं नव्हतं. तसंच, आम्हालाही याची कल्पना नाही. हे सर्व करायचं म्हणजे भाजपाबरोबर राहून करायचं आहे, त्यामुळे त्यांना विचारलं पाहिजे”, असं छगन भुजबळ म्हणाले.