scorecardresearch

“या सगळ्याची किळस वाटते”, महात्मा गांधींबद्दलच्या ‘त्या’ विधानावरून आव्हाडांचा गुणरत्न सदावर्तेंवर निशाणा!

जितेंद्र आव्हाड म्हणतात, “हे काय चाललंय देशात हेच कळत नाही. त्यांना गांधी आठवलेच नसतील. कारण शरद पवारांच्या घरावर हल्ला करताना त्यांच्यामधला नथुराम…!”

jitendra awhad on gunratna sadavarte
जितेंद्र आव्हाडांची गुणरत्न सदावर्तेंवर टीका

“गांधीजींनी श्वास सोडताना हे राम म्हटलंच नव्हतं असं गोडसेजींनी कोर्टात ट्रायल झाली तेव्हा स्पष्ट केलं होतं”, असं विधान अॅडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांनी केल्यानंतर त्यावरून वाद सुरू झाला आहे. तसेच, गांधीवादाने देशाची आणि महाराष्ट्राची मोठी फसवणूक केल्याचं देखील सदावर्ते म्हणाले होते. यासंदर्भात प्रसारमाध्यमांशी बोलताना राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी गुणरत्न सदावर्ते यांना सुनावलं आहे. सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर येथील ईदगाह मैदान परिसरातील सभागृह बांधकाम शुभारंभ प्रसंगी आव्हाड हे बोलत होते. यावेळी गुणरत्न सदावर्ते यांचा उल्लेख वेडा माणूस असा करत आव्हाडांनी टीका केली आहे.

“गांधींबद्दल बोलताना काहीच वाटलं नाही?”

सांगलीत माध्यमांनी गुणरत्न सदावर्ते यांच्या विधानाविषयी विचारणा करताच आव्हाडांनी त्यांच्यावर परखड शब्दांत टीका केली. “घृणा येते या सगळ्याची. किळस वाटते. गांधींनी या देशाला फसवलं असं एखादा वेडा माणूसच म्हणू शकतो. ज्या गांधींपुढे नेल्सन मंडेला, जगातले सगळे मोठे नेते नतमस्तक झाले, आजही होतात. या देशातले नेते विदेशात गेले की एकच नाव कानावर पडतं, ते म्हणजे महात्मा गांधी. त्या गांधींबद्दल असं बोलताना त्यांना काहीच वाटलं नसेल का?” असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी यावेळी केला.

“पवारांच्या घरी हल्ला करताना नथुरामच जागा झालेला”

दरम्यान, यावेळी शरद पवारांच्या घरी एसटी कर्मचाऱ्यांनी नेलेल्या मोर्चाचा संदर्भ देत आव्हाडांनी निशाणा साधला. “हे काय चाललंय देशात हेच कळत नाही. त्यांना गांधी आठवलेच नसतील. कारण शरद पवारांच्या घरावर हल्ला करताना त्यांच्यामधला नथुरामच जागा झाला होता. ८२ वर्षांचा वृद्ध माणूस, त्याची ७८ वर्षांची पत्नी घरी आहे. त्या घरावर तुम्ही हल्ला करता. तुमच्या डोक्यात नथुरामच आहे. ते तुम्ही बोलून दाखवलं. नथुरामजी गोडसेजी असा उल्लेख केला. आमच्या दृष्टीने भारतातला पहिला आतंकवादी नथुराम होता. ज्यानं महाराष्ट्रावर गांधीहत्येचा जो काळा डाग आहे, तो या नालायक माणसामुळे आहे. तो डाग आपण नाही पुसू शकत. जगात कुठेही असं विचारलं जातं की हा नथुराम कुठला. तेव्हा आपल्याला शरमेनं मान खाली घालावी लागते की हा नथुराम महाराष्ट्रातला होता”, असं आव्हाड यावेळी म्हणाले.

“त्यांनी लोकसभाही लढवावी, पण…”

गुणरत्न सदावर्ते यांनी एसटी कष्टकरी जनसंघाची स्थापना केल्याची घोषणा करतानाच एसटी कामगार राज्यातल्या सर्व निवडणुका लढवणार असल्याचे संकेत दिले. त्याविषयी देखील आव्हाडांनी टोला लगावला. “”त्यांनी लोकसभेचीही निवडणूक लढवावी. मला त्यांच्या राजकीय विचारांबद्दल काहीच बोलायचं नाही. पण गांधींबद्दल जो माणूस बोलतो. त्याच्याविरोधात मी बोलणार. हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे. त्यांनी कुणाबद्दलही बोलावं. पण गांधींबद्दल बोलू नये, एवढीच माझी अपेक्षा आहे”, असं आव्हाड म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Jitendra awhad slams gunratna sadavarte on mahatma gandhi statement pmw

ताज्या बातम्या