महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाराष्ट्र दिनी औरंगाबादमध्ये घेतलेल्या सभेनंतर पुन्हा एकदा राज्यातील राजकीय वातावरण तापलं आहे. अशाच आता राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी राज ठाकरेंवर निशाणा साधलाय. जातीयवाद आणि लेखक या दोन्ही गोष्टींवरुन मनसे आणि राष्ट्रवादीमध्ये एकमेकांवर आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात असतानाच आव्हाड यांनी जेम्स लेन प्रकरण आम्ही बाबासाहेब पुरंदरेंच्या निधनानंतर कधीच चर्चेत आणलं नाही असं म्हटलंय.

नक्की वाचा >> “त्यांना कॅन्सर डिटेक्ट झाला आणि ऑपरेशन झालं, त्यानंतर…”; शरद पवार ब्राह्मणांचा द्वेष करत असल्याच्या आरोपावर आव्हाडांचं उत्तर

पुरंदरेंच्या निधनानंतर आम्ही तो विषय काढलाच नाही
जेम्स लेन प्रकरणावरुन राज ठाकरेंनी केलेल्या टीकेसंदर्भात प्रश्न विचारण्यात आला असता आव्हाड यांनी आमचा पुरंदरेंविरोधातील वैचारिक संघर्ष त्यांच्या मृत्यूनंतर संपुष्टात आल्याचं म्हटलं. “एवढे शिवद्रोही का आहेत ते? बाबासाहेब पुरंदरेंच्या मृत्यूनंतर आम्ही आईसाहेबांच्या (माँसाहेब जिजाऊ) चारित्र्याबद्दल बोलणाऱ्या जेम्स लेनचा विषय कधी काढलाच नाही. आमच्या चर्चेतला भागच नाही तो विषय. माणूस जिवंत असताना त्याच्या विचारांशी वैचारिक संघर्ष करायचा असतो,” असं आव्हाड म्हणाले.

पुरंदरे काही फिलॉसॉफर नाही
पुढे बोलताना पुरंदरे हे कांदबरीकार होते ते फिलॉसॉफर नव्हते असंही आव्हाड म्हणालेत. “बाबासाहेब पुरंदरे हे काही फिलॉसॉफर नव्हते. की जसं या देशामध्ये गांधीवाद आहे. जसं जागामध्ये मार्क्सवाद आहे. जगात अंबेकराइट्स आहेत. तसे पुरंदराइट्स किंवा पुरंदरेवादी असा शब्द अजून आलेला नाही ना कुठे? आमचं म्हणणं हेच आहे की बाबासाहेब पुरंदरे हे कादंबरीकार होते. त्यांनी ऐतिहासिक संदर्भ घेऊन कादंबरीमध्ये शिवाजी महाराजांची आणि त्यांच्या आईसाहेबांची आणि पर्यायाने शहाजी महाराजांची विटंबना करायला नको होती. एवढाच आमचा वाद आहे. आमचा पुरंदरेंना विरोध नाही. कादंबरीकार म्हणून ते सर्वश्रेष्ठ असतील,” असं आव्हाड यांनी म्हटलंय.

नक्की वाचा >> “…म्हणून शरद पवारांना टार्गेट करुन गोळ्या मारताय, मला समजत नाही तुम्हाला…”; राज ठाकरेंवर आव्हाड संतापले

पवार सत्तेत असो नसो..
“पुरंदरेंना नाशिकमधील कुसुमाग्रजांशी संबंधित संस्थेनं पुरस्कार दिला. तो देणारी लोक कोण आहेत सर्व पवारासाहेबांच्या जवळची लोक आहेत. महाराष्ट्रातील साहित्य संमेलनाचा इतिहास बघा. पवार सत्तेत असो नको, विरोधी पक्षात असो नसो ते अध्यक्ष किंवा उद्घाटक तरी असतात. आता उदगीरला साहित्य समेलन झालं अध्यक्ष पवारच होते,” असंही आव्हाड म्हणालेत.

कशाला जातीजातीमध्ये खेळताय?
“पवारांना साहित्य संमेलनाला बोलवणारे साहित्यिकच असतात. त्या साहित्यिकांमध्ये सगळेच असतात. जाती वर्णात विभागले गेलेत हे मला नव्याने समजतंय. महाराष्ट्रातील सर्वात मोठी कविता जी मंत्रालयाच्या दारात लावलीय ती वि. वा. शिरवाडकरांची आहे. ज्यांना संपूर्ण महाराष्ट्र कुसुमाग्रज म्हणून ओळखतो. ज्यांची संपूर्ण पुस्तकं महाराष्ट्राने वाचलीय ते प्रल्हाद केशव अत्रे, ज्यांची नाटकं बघायला सगळे उतावळे असायचे प्रभाकर पणशीकर. कशाला जातीजातीमध्ये खेळताय?,” असा प्रश्न आव्हाड यांनी विचारलाय.

राज ठाकरे नेमकं काय म्हणालेले?
“बाबासाहेब पुरंदरे सॉफ्ट टार्गेट आहेत. त्यांनी चुकीचा इतिहास सांगितला म्हणे. पण कोणत्या पानावर सांगितला ते तर सांगा. यांचे इतिहासकार कोण? तर कोकाटे. महाराजांवर आजपर्यंत रणजित देसाईंनी लिहिलं, संभाजी महाराजांवर बाबासाहेबांनी, मेहेंदळेंनी लिहिलं. प्रत्येकानं आपापल्या पद्धतीने शिवाजी महाराज लोकांपर्यंत आणले. पण बाबासाहेब पुरंदरेंमुळे घराघरात शिवाजी महाराज पोहोचले. पण आम्हाला इतिहास बघायचा नाही. आम्हाला ते पुस्तक कोणत्या जातीच्या माणसानं लिहिलंय, ते बघायचंय. आम्ही छत्रपतींचा इतिहास सांगणार नाही. आम्ही मराठेशाहीचा इतिहास सांगताना त्यात फोड करणार की पेशव्यांनी केलेली गोष्ट वगैरे. शरद पवार साहेब, काय चाललंय? तुमच्यासारख्या बुजुर्ग माणसानं या महाराष्ट्रातला जातीपातीचा भेद गाडून टाकला पाहिजे. तुम्ही यासाठी प्रयत्न केला पाहिजे. पण तुमच्या राजकीय स्वार्थासाठी या सगळ्या गोष्टी सुरु आहेत,” असा आरोप राज ठाकरेंनी ठाण्यातील सभेमधील भाषणातून केला होता.

पवारांनी काय उत्तर दिलं होतं?
“शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी इतिहास वेगळ्या दिशेने नेण्याचा प्रयत्न केला होता. शिवाजी महाराजांना जिजामातांनी घडविले. पण, त्यांना दादोजी कोंडदेव यांनी घडविले, असं पुरंदरे यांनी लिहून ठेवलं होतं. जेम्स लेनने शिवाजी महाराजांबद्दल जे गलिच्छ लिखाण केले त्याची माहिती बाबासाहेब पुरंदरे यांनी पुरविली होती, असा उल्लेख लेनच्या पुस्तकात आहे. त्यावर पुरंदरे यांनी कधी खुलासा केला नव्हता. यातूनच मी पुरंदरे यांच्यावर टीकाटिप्पणी केली होती व त्याबद्दल मला अभिमान आहे,” असं शरद पवार यांनी म्हटलं होतं.