गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री केतकी चितळे हिने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासंदर्भात केलेल्या फेसबुक पोस्टची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. या आक्षेपार्ह पोस्टसंदर्भात केतकी चितळेविरोधात राज्यभरात १० ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या तक्रारीनंतर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. केतकी चितळेला अटक करण्यात आली असून तिची ठाणे क्राईम ब्रांचकडून चौकशी सुरू आहे. यादरम्यान, एकीकडे केतकी चितळे प्रकरणाची थेट न्यायालयात सुनावणी सुरू असताना दुसरीकडे राजकीय वर्तुळात देखील तिच्या पोस्टवरून आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष आणि माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी केतकी चितळेचं कौतुक केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी सदाभाऊ खोत यांना खुलं आव्हान दिलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

घाटकोपर येथील माता रमाबाई आंबेडकर नगर मध्ये झालेल्या बुद्ध पौर्णिमेच्या कार्यक्रमानंतर माध्यमांशी बोलताना जितेंद्र आव्हाडांनी भाजपावर टीका करतानाच केतकी चितळे प्रकरणावरून सदाभाऊ खोतांना आव्हान दिलं. तसेच, यावेळी त्यांनी नाना पटोलेंच्या भूमिकेवरून देखील निशाणा साधला.

“यातून तुमची अपरिपक्वता दिसते”

राष्ट्रवादी काँग्रेसनं भंडारा-गोंदिया जिल्हा परिषद सभापतीपदाच्या निवडणुकीत पाठीत खंजीर खुपसल्याची टीका करत नाना पटोलेंनी थेट काँग्रेस हायकमांडकडे यासंदर्भात मुद्दा उपस्थित केल्यासंदर्भात जितेंद्र आव्हाडांनी खोचक प्रतिक्रिया दिली आहे. “नाना पटोले कुठेही पोहोचू द्या. महाराष्ट्र सरकार व्यवस्थित सुरू आहे. राज्य सरकारमध्ये अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात असे अनेक मंत्री आहेत. शेवटी एका घरात मोठा भाऊ-छोटा भाऊ अशी भांडणं असतातच. फक्त याबाबत बाहेर जाऊन बोलणं यात तुमची प्रगल्भता दिसते. यातून तुमच्यातला अपरिपक्वपणा दिसतो”, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले.

“विकृत माणसांची ही सवय असते”

सदाभाऊ खोत यांनी केतकी चितळे प्रकरणानंतर तिचं कौतुक केल्यावरून आव्हाडांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. “केतकीनं पवारांविषयी लिहिलं म्हणून सदाभाऊ खोतांना राग येत नसेल कदाचित. ८१ वर्षांच्या म्हाताऱ्याच्या आजाराबद्दल बोलल्यानंतर, त्याच्या मरणाची इच्छा व्यक्त केल्यानंतर सदाभाऊंना राग येत नसेल. विकृत माणसांची सवय असते ती”, असं आव्हाड म्हणाले आहेत.

“मोदी म्हणाले होते रुपया गिरता है तो देश की इज्जत उतरती है, आता तर…”, जितेंद्र आव्हाडांचा महागाईवरून टोला!

“मला सदाभाऊंना प्रश्न विचारायचा आहे. त्यांनी हिंमत असेल तर त्यांनी उत्तर द्यावं. तिनं जे बाबासाहेबांबद्दल लिहिलंय, तिनं जे महात्मा फुलेंबद्दल लिहिलंय, जे बौद्ध बांधवांबद्दल लिहिलंय त्याबाबत तिच्यावर अॅट्रॉसिटिचा गुन्हा दाखल झालाय. यावरून ती कणखर मनाची आहे असं तुम्ही मानताय का? तिला माझं समर्थन आहे असं म्हणण्याची तुमच्यात हिंमत आहे का? मग या, शिवाजी पार्कवर एकटे उभे राहून म्हणून दाखवा की माझं केतकीला समर्थन आहे. मी तिनं काय काय लिहिलंय याची आख्खी पोस्ट टाकणार आहे. तिची मानसिकता काय आहे, ती लिहिते कशी याकडे फक्त ती स्त्री आहे म्हणून दुर्लक्ष करून चालणार नाही. प्रचंड आत्मप्रौढीपणा तिच्यात ठसठसून भरलाय”, असं आव्हाड म्हणाले.

काय म्हणाले होते सदाभाऊ खोत?

“ती कणखर आहे. तिला कुणाच्या समर्थनाची गरज नाही. तिनं न्यायालयात वकील न देता स्वत:ची बादू मांडली. त्यामुळे तिला मानावं लागेल”, असं खोत म्हणाले होते. मात्र यावरून वाद सुरू झाल्यानंतर खोत यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना केतकी चितळेच्या विधानाचे नाही तर तिने न्यायालयात कोणत्याही वकिलाची मदत न घेता स्वतः आपली बाजू मांडल्याचे आपणांस कौतुक वाटले आणि तिचा अभिमानही वाटला, असा खुलासेवजा दावा केला. चितळे हिने पवारांवर काही बोलले तर तो गुन्हा ठरतो आणि राष्ट्रवादीच्या अमोल मिटकरी यांनी ब्राम्हण समाजाविषयी बेताल विधान केले की तो गुन्हा कसा ठरत नाही, असा सवालही खोत यांनी यावेळी उपस्थित केला.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jitendra awhad slams sadabhau khot on ketaki chitale fb post sharad pawar pmw
First published on: 17-05-2022 at 13:53 IST