“हे घ्या तुमच्या ढोंगी अपप्रचाराला आमचे खरे उत्तर”, टिपू सुलतान वादावर जितेंद्र आव्हाडांनी शेअर केला ‘तो’ फोटो!

जितेंद्र आव्हाड यांनी संविधानाच्या मूळ प्रतीचा एक फोटो ट्वीट करून भाजपावर खोचक शब्दांमध्ये निशाणा साधला आहे.

jitendra awhad
जितेंद्र आव्हाड (संग्रहीत छायाचित्र)

मुंबईतील एका मैदानाला टिपू सुलतान यांचे नाव द्यायचे की नाही? यावरून सध्या राज्यात राजकीय वाद सुरू झाला आहे. एकीकडे भाजपाकडून याला जोरदार विरोध केला जात असतानाच दुसरीकडे २०१३मध्ये भाजपानंच एका रस्त्याला टिपू सुलतान यांचं नाव देण्याचा निर्णय घेतल्याचा दावा महाविकास आघाडीकडून करण्यात आला आहे. त्यामुळे या मुद्द्यावरून राज्यातलं राजकारण चांगलंच पेटलेलं असताना आता राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी या वादात उडी घेतली आहे. भाजपाच्या दाव्याला प्रत्युत्तर देताना जितेंद्र आव्हाड यांनी थेट संविधानाच्या मूळ प्रतीमधलाच एक फोटो शेअर केला असून त्यात उलट विरोधकांनाच प्रतिप्रश्न केला आहे.

“हे घ्या तुमच्या ढोंगी अपप्रचाराला आमचे खरे खरे उत्तर. संविधानाच्या मूळ प्रतीमध्ये राणी लक्ष्मीबाई यांच्यासोबतच टिपू सुलतान यांच्या पराक्रमाला स्थान देऊन गौरविण्यात आलं आहे. आता तुम्ही ठरवा जे संविधानात आहे ते तुम्हाला मान्य आहे की नाही?” असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या ट्वीटमध्ये उपस्थित केला आहे.

दरम्यान, यासोबतच आव्हाड यांनी भाजपाला खोचक टोला देखील लगावला आहे. “मुंबईच्या एम/पूर्व वॉर्डातील रस्त्याला शहीद टिपू सुलतान मार्ग नाव देण्याच्या भाजपा नगरसेवकाच्या प्रस्तावाच्या समर्थनासाठी दुथडी भरून भाजपाचे नगरसेवक उपस्थित होते. भाजपासाठी २०१३ चे टिपू वेगळे, २०२२ ला वेगळे! फरक हाच की तेव्हा निवडणूक नव्हती आता आहे”, असं जितेंद्र आव्हाड यांनी या ट्वीटमध्ये नमूद केलं आहे.

“आधी होता पाग्या, मग झाला वाघ्या”, टिपू सुलतान वादावरून भाजपाचा शिवसेनेवर निशाणा!

वाद काय आहे?

मुंबईतील मालवणी भागात एका मैदानाला टिपू सुलतान यांचं नाव देण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. अस्लम शेख यांच्या आमदार निधीमधून या मैदानाचं बांधकाम झालं आहे. मात्र, हिंदुंवर अनन्वित अत्याचार करणाऱ्या व्यक्तीचं नाव मैदानाला देऊ नये, अशी मागणी भाजपाकडून करण्यात आली आहे. तर, भाजपाने देखील मुंबईतल्या एका रस्त्याला ‘वीर टिपू सुलतान’ असं नाव दिलेलं आहे, असा दावा अस्लम शेख यांनी केला आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Jitendra awhad targets bjp on tipu sultan name ground in mumbai pmw

Next Story
“हे सरकार पूर्णपणे बेवड्यांना समर्पित”, सुधीर मुनगंटीवारांचा राज्य सरकारवर निशाणा!
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी