scorecardresearch

“गरीब की जान क्या जान नहीं होती शेठ?” जितेंद्र आव्हाडांचं खोचक ट्वीट, दानवेंवर साधला निशाणा!

जितेंद्र आव्हाड रावसाहेब दानवेजी म्हणतात, “उद्या रेल्वे बंद पडल्यास दोष देऊ नका”

jitendra awhad on raosaheb danve
जितेंद्र आव्हाडांचा रावसाहेब दानवेंना खोचक टोला!

केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकार यांच्यामध्ये सातत्याने सुंदोपसुंदी सुरू असल्याचं चित्र गेल्या काही महिन्यांमध्ये दिसून आलं आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र विरुद्ध राज्य सरकार असा सामना सुरू असताना अनेक मुद्द्यांवरून हा वाद दिसून येतो. नुकतंच राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या ट्वीटमधून केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्यावर खोचक शब्दांत निशाणा साधण्यात आला आहे. या ट्वीटमुळ पुन्हा एकदा केंद्र सरकार विरुद्ध राज्य सरकार यांच्यामध्ये कलगीतुरा दिसू लागला आहे.

नुकतीच केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव आणि रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी यांनी दिवा सहाव्या मार्गिकेच्या उद्घाटनाला हजेरी लावली होती. त्यावेळी रेल्वेमंत्र्यांनी रेल्वे रुळाच्या बाजूला असणारी घरं पुनर्वसनाचा मुद्दा निकाली निघाल्याशिवाय पाडणार नसल्याचं आश्वासन इथल्या रहिवाशांना दिलं होतं. मात्र, आता पुन्हा एकदा इथल्या रहिवाशांना घरं खाली करण्यासंदर्भात नोटिसा येत असल्याचा मुद्दा जितेंद्र आव्हाड यांनी ट्वीटमधून उपस्थित केला आहे.

“रेल्वे बंद पडल्यास दोष देऊ नका”

जितेंद्र आव्हाडांनी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना खोचक टोला लगावला आहे. “दानवे साहेब, आज रेल्वेचे अधिकारी घर खाली करा सांगण्यासाठी गेले होते. आपण स्थगिती दिली होती असे सांगितले होते. आता काय समजायचे? गरीब की जान क्या जान नहीं होती शेठ? रावसाहेब दानवे, उद्या रेल्वे बंद पडल्यास दोष देऊ नका”, असं जितेंद्र आव्हाडांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

“दलित माणूस राष्ट्रपती होऊ शकतो ही संविधानाची देणगी, तर लग्नात घोड्यावर बसू शकत नाही ही…”, आव्हाडांचं ट्वीट चर्चेत

नेमका काय आहे वाद?

ठाण्याच्या मध्य रेल्वे मार्गावरील कळवा-मुंब्रा-दिवापासून ते थेट कल्याण-कर्जतपर्यंत रेल्वे रुळाशेजारी असलेली घरे हटविण्याचे आदेश रेल्वेमंत्र्यांनी दिले होते. तशी कारवाईही रेल्वे अधिकार्‍यांनी सुरू केली होती. दरम्यान, दिव्याच्या पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेच्या उद्घाटनासाठी रेल्वेमंत्री अश्विनी कुमार आणि रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे हे ठाण्यात आले होते. या दोन्ही मंत्र्यांची आव्हाडांनी भेट घेऊन रेल्वे रुळालगतच्या रहिवाशांचे आधी पुनर्वसन करा, मगच ही जागा रिकामी करा, अशी मागणी केली होती. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनीही तशी मागणी केली होती. तसेच राज्य सरकारमार्फत या रहिवाशांचे आजुबाजूच्या परिसरात पुनर्वसन करण्यासंबंधीचा प्रस्ताव देऊन त्यास सहकार्य करावे, अशी मागणीही त्यांनी केली होती.

“आता १० रुपयांच्या गोळ्या घेतानाही विचार करावा लागेल”, जितेंद्र आव्हाडांचा ईडीवर निशाणा; म्हणाले, “जेव्हा नितीन गडकरींवर…!”

रेल्वेमंत्र्यांचे आश्वासन

त्यावेळी रेल्वेमंत्री अश्विनीकुमार व रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनीही सकारात्मकता दर्शविली होती. तसेच जोपर्यंत रहिवाशांचे पुनर्वसन होत नाही तोपर्यंत कारवाई होणार नाही, असे आश्वासन दिले होते. असे असतानाही राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी रेल्वे अधिकार्‍यांना रेल्वे रुळा परिसरातील घरे खाली करण्याचे आदेश देऊन रहिवाशांना धमकावण्याचे सत्र सुरू केले आहे, असा आरोपही त्यांनी केला आहे. तसेच “उद्या रेल्वे बंद पडल्यास दोष देऊ नका,’ असा इशाराही त्यांनी रेल्वे राज्यमंत्र्यांना दिला आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Jitendra awhad tweet railway track side slum rehabilitation raosaheb danve pmw

ताज्या बातम्या