राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्हासंदर्भात केंद्रीय निवडणूक आयोगासमोर काल ( २० नोव्हेंबर ) सुनावणी पार पडली. या सुनावणीला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, आमदार जितेंद्र आव्हाड, आमदार सुनील भुसारा उपस्थित होते. अजित पवार गटाकडून खोटी प्रतिज्ञापत्रे सादर केल्याचे आरोप वारंवार केले जात आहेत. काल झालेल्या सुनावणीत शरद पवार गटाकडून त्याचे पुरावेच देण्यात आले. याबाबत राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी X वर पोस्ट लिहित कालच्या संपूर्ण सुनावणीचा घटनाक्रम सांगितला आहे.
“निवडणूक आयोगासमोर, जी सुनावणी झाली त्यामध्ये फुटीर राष्ट्रवादी गटाच्या बनावटगिरीचे अनेक उदाहरण आम्ही समोर आणून तर दिलेच शिवाय त्यासोबतच सुप्रीम कोर्टाचे असे बनावटगिरी विरोधात दिलेले विविध २७ निकालपत्र देखील आम्ही आयोगासमोर ठेवले. जेव्हा एखादा याचिकाकर्ता कोर्टासमोर जातो तेव्हा त्याच्यावर ही नैतिक जबाबदारी असते की त्याने, संबंधित केसच्या संदर्भात कोणतीही खोटी कागदपत्रे न्यायालयासमोर सादर करू नयेत. अशी फसवेगिरी करणाऱ्या, बनावटगिरी करणाऱ्या याचिकाकर्त्यांच्या विरोधात यापूर्वी देखील मा. न्यायालयाने अनेकवेळा कठोर पाऊले उचलली आहेत. किंबहुना अशा अनैतिक प्रकार करणाऱ्या याचिकाकर्त्यांच्या याचिका या विचारातच घेऊ नयेत, असे देखील विविध कोर्टाने अनेक ठिकाणी नमूद करून ठेवलेले आहे. या सोबतच Constitutional बेंचने देखील असेच अनेक निर्णय दिले आहेत”, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले.
“त्यामुळे फुटीर गटाने कितीही म्हटले तरी, तब्बल २० हजार खोटी कागदपत्रे सादर करणाऱ्या, अशी बनावटगिरी करणाऱ्या लोकांची याचिका ही विचारातच घेऊ नये, अशी भूमिका आमच्या वकिलांनी आयोगासमोर मांडली. त्याचबरोबर कुवर प्रतापसिंह चौधरी हा माणूस आदरणीय पवार साहेबांच्या सोबत असताना, त्यांचं नाव फुटीर गटाच्या राष्ट्रीय कार्यकारणीत दाखवल गेलं आणि म्हणूनच या प्रकरणाची शहानिशा करण्यासाठी सदरील व्यक्तीला आयोगासमोर उभे करण्यात आले”, असंही आव्हाडांनी पुढे स्पष्ट केलं.
हेही वाचा >> “अजित पवार गटाकडून निवडणूक आयोगात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रांपैकी एकही…”, राष्ट्रवादीच्या वकिलाचा मोठा दावा
“आमचे वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी भूतकाळातील अनेक उदाहरणांचा आधार घेत, बनावट कागदपत्रांच्या बाबतीतील अनेक न्यायालयीन उदाहरणे यावेळी आयोगासमोर ठेवली.वकिलांनी मांडलेल्या सर्व न्यायालयीन निर्णयाला निवडणूक आयोगाने गांभीर्याने घेत, अभिषेक मनु सिंघवी यांनी मांडलेल्या सर्व बाबी आज रेकॉर्डवर घेतल्या”, असंही ते म्हणाले.
“निवडणूक आयोगासमोर आता, फुटीर गटाने सादर केलेल्या बनावट कागदपत्रांचे काय करायचे..? हा प्रश्न उपस्थित होणार आहे. कारण त्यांच्या ताब्यात ती सगळी कागदपत्रे आहेत. मा. सर्वोच्च न्यायालयाने हे नोंदवून ठेवले आहे की, ट्रिब्युनल किंवा खालच्या कोर्टाच्या समोर अशा प्रकारच्या बनावटगिरी करणाऱ्या केसेस आल्यास त्यासंदर्भात संबंधित ट्रीब्यूनल किंवा कोर्टाने कडक अशी भूमिका घ्यायला हवी”, असं जितेंद्र आव्हाडांनी X पोस्टमध्ये म्हटलं आहे.
“आमच्या पक्षाकडून फुटीर गटाच्या बनावटगिरीची सगळी कागदपत्रे सादर करण्यात आली आहेत. आता याबाबत निवडणूक आयोग नेमकी काय भूमिका घेते हे बघण्यासारखं असणार आहे. कारण अशा बनावटगिरी प्रकरणात मा. सर्वोच्च न्यायालयाने वेळोवेळी दिलेल्या निकालांना, निवडणूक आयोग दुर्लक्षित करून असच सहज बाजूला टाकता येणार नाहीये. तसेच, वर सांगितल्या प्रमाणे, बनावटगिरीच्या बाबत जवळपास २७ पेक्षा जास्त केसेसची माहिती आमचे वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी आयोगासमोर मांडली आहेत. या सर्व बाबींना मा.निवडणूक आयोगाने शांतपणे ऐकून घेतले असून त्याच्या सर्व नोंदी घेतल्या आहेत”, असंही ते म्हणाले.
“बाकी, आपलं साम्राज्यच बेईमानाच्या भरोश्यावर उभं करणाऱ्या फुटीर गटातील नेत्यांना या असल्या बनावटगिरी एकदमच चिल्लर वाटत असतील, हा भाग वेगळा”, असा टोलाही त्यांनी लगावला.