छत्रपती संभाजीनगर : संतोष देशमुख हत्या प्रकरणातील निलंबित पोलीस अधिकारी आणि एक न्यायाधीश यांची एकत्रितपणे धुळवड खेळतानाची छायाचित्रे प्रसारित झाल्याने या प्रकरणाला नवे वळण लागले आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी ही छायाचित्रे त्यांच्या समाजमाध्यम खात्यावरून प्रसारित करून न्यायाधीशांच्या आचारसंहितेवर प्रश्न उपस्थित केला आहे.

बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या तपासात कसूर केल्याप्रकरणी निलंबित करण्यात आलेल्या पोलीस अधिकाऱ्याची न्यायाधीशाबरोबर धुळवड खेळतानाची छायाचित्रे दमानिया यांनी ‘एक्स’वरून प्रसारित केली. ‘छायाचित्राची खात्री करून घ्यावी’ असे सांगतानाच दमानिया यांनी न्यायाधीशांच्या आचारसंहितेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. ‘या छायाचित्रातील व्यक्ती जर एकत्र दिसत असतील तर न्यायालयीन वर्तन नियमांचा भंग होत असल्याचे माझे मत आहे,’ असे त्यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले. ‘लोकसत्ता’ या छायाचित्रांतील व्यक्ती वा तारीख यांची पुष्टी करत नाही.

दरम्यान, या छायाचित्रात दिसणाऱ्या एका अधिकाऱ्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, ‘आम्ही ज्या भागात राहतो, त्या भागात तीन न्यायाधीश राहतात. होळीनिमित्ताने केवळ आम्हीच जमलो होतो असे नाही तर २५ हून अधिक जण तेथे होते. मात्र काही जणांचे छायाचित्र समाजमाध्यमांवर आले आहे. आम्हाला व्यक्तिगत आयुष्य आहे की नाही, असा प्रश्न पडतो.’