जुन्नर : जुन्नर तालुक्यातील येडगाव धरणाच्या कुकडी डाव्या कालव्यात पडून उंब्रज येथील अक्षय यशवंत शिंगोटे (वय २८) आणि प्राजक्ता अक्षय शिंगोटे (वय २५) या दाम्पत्याचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेनंतर सुमारे ४० तासांनी, बुधवारी (१ एप्रिल) सकाळी दहा वाजता लेंडेस्थळ येथे दोघांचेही मृतदेह आढळून आले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काळवाडीच्या दिशेने जाणाऱ्या कालव्याच्या पुलाजवळ काही नागरिकांना एक लहान बालक कालव्याच्या कडेला उभे राहून आई-वडिलांना हाका मारताना दिसले. नागरिकांनी तत्काळ त्या ठिकाणी धाव घेतली असता तेथे चप्पल आढळून आली. कालव्याकडे लक्ष दिल्यावर संबंधित दाम्पत्य पाण्याच्या प्रवाहात वाहून जात असल्याचे दिसून आले. या घटनेची माहिती मिळताच आळेफाटा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विश्वास जाधव आणि त्यांचे सहकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. श्रीगोंदा तालुक्यातील विसापूरपर्यंत शोध मोहीम राबविण्यात आली. बोटीच्या सहाय्याने शोधकार्य सुरू ठेवण्यात आले. मात्र, कालव्यातील तीव्र प्रवाहामुळे अडचणी निर्माण झाली.
उंब्रज आणि काळवाडी गावचे सरपंच हिरामण शिंगोटे, तुषार वामन, उंब्रजचे पोलीस पाटील राहुल हांडे आणि ग्रामस्थांनी पाटबंधारे विभागाकडे कालव्यातील पाणी कमी करण्याची मागणी केली. आळेफाटा पोलीस ठाण्याकडूनही याबाबत पत्र देण्यात आले. ग्रामस्थांच्या आक्रमक भूमिकेनंतर अधिकाऱ्यांनी थोड्या कालावधीसाठी पाणी बंद करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर जुन्नर येथील शिवनेरी रेस्क्यू टीमच्या दहा सदस्यांच्या मदतीने पुन्हा शोधमोहीम राबविण्यात आली. घटनेच्या ठिकाणापासून सुमारे दीड किलोमीटर अंतरावर लेंडेस्थळ येथे दोघांचेही मृतदेह मिळून आले.
