JW Marriott Mumbai cockroach news update: मुंबईतील प्रसिद्ध आणि नामांकित हॉटेलमध्ये जेवणाच्या टेबलवर झुरळ दिसले असल्याचा धक्कादायक दावा प्रसिद्ध हृदयरोगतज्ज्ञ डॉ. अशोक सेठ यांनी केला आहे. त्यांनी याबाबता व्हिडिओच अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांना टॅग करत सोशल मीडियावर शेअर केला. या घटनेमुळे देशातील एका नामांकित लक्झरी हॉटेलमधील स्वच्छतेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत.

शनिवारी संध्याकाळी डॉ. सेठ मुंबईतील JW मॅरियट (सहार) येथील रोमानो रेस्टॉरंटमध्ये जेवत असताना त्यांना टेबलवर डिशेसभोवती एक झुरळ फिरताना दिसलं. “बघा रात्री जेवणासाठी अनपेक्षितपणे कोण आलं. ‘रोची’ – एक छोटं झुरळ शनिवारी रात्री मुंबईच्या सहारमधील JW मॅरियटच्या रोमानो रेस्टॉरंटमध्ये आमच्यासोबत जेवण शेअर करण्यासाठी टेबलवर आलं होतं!!! आम्ही खूप प्रयत्न करूनही ‘रोची’ तिथून जायला तयार नव्हता. कदाचित त्याला पास्ता ऐवजी पिझ्झा हवा असावा”, अशी उपरोधिक पोस्ट त्यांनी रविवारी संध्याकाळी एक्सवर केली.

आमची भूकच गेली

डॉ. सेठ यांनी पुढे सांगितलं की, हे दृश्य पाहून त्यांची भूकच मेली आणि ते जेवण अर्धवट सोडून तिथून निघून गेले. “त्याने आमची भूक पूर्णपणे घालवली. आम्ही तिथून निघून आलो”, असं त्यांनी पुढे सांगितलं. या घटनेवर JW मॅरियट प्रशासनाकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. यानंतर डॉ. सेठ यांनी थेट अन्न सुरक्षा आयुक्तांचा उल्लेख करत टीका केली. “सुदैवाने आपण सध्या मुंडे यांच्या कार्यक्षेत्रात आहोत आणि ते नक्कीच या प्रकरणात लक्ष घालतील”, असं त्यांनी लिहिले.

हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि गोदामांमधील स्वच्छतेच्या नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यासाठी सध्या घराघरात नाव पोहोचलेले अन्न सुरक्षा आयुक्त तुकाराम मुंडे, FSSAI आणि JW मॅरियट यांना त्यांनी या पोस्टमध्ये टॅग केले. सोमवारी ‘NDTV’ शी बोलताना डॉ. सेठ यांनी हा अत्यंत गंभीर प्रकार असल्याचे सांगत स्वच्छतेबाबत निष्काळजीपणा दाखवल्याबद्दल हॉटेलवर कडाडून टीका केली. “आम्हाला टेबलवर एक झुरळ दिसलं, याचा अर्थ किचनमध्ये अशी अनेक झुरळे असणार हे निश्चित. यावरून मॅरियटचा स्वच्छतेबाबतचा अत्यंत उदासीन दृष्टिकोन दिसून येतो”, असं ते म्हणाले. काही परदेशी प्रतिनिधींसोबत आपण तिथे जेवायला गेलो होतो, हे नमूद करत डॉ. सेठ यांनी ही घटना देशासाठी लज्जास्पद असल्याचे म्हटलं.

“हे एक पंचतारांकित हॉटेल आहे. जेवणासाठी ते खूप मोठे शुल्क आकारतात. त्यांची सेवा आणि स्वच्छता यापेक्षा बरी असायला हवी”, अशा शब्दांत संतापलेल्या डॉ. सेठ यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आणि तुकाराम मुंडे या प्रकरणाची दखल घेतील, अशी अपेक्षा व्यक्त केली.