Chhagan Bhujbal on Telangana Mahatma Phule Statue Vandalise : तेलंगणातील संगारेड्डी जिल्ह्यातील तेल्लापूर गावात महात्मा जोतिबा फुले यांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे महाराष्ट्रातून संताप व्यक्त केला जात आहे. आता राज्याचे अन्न व पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पत्र लिहून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. या घटनेतील आरोपींवर कठोरातील कठोर शिक्षा द्यावी, तसंच, महात्मा जोतिबा फुले यांची नवा पुतळा स्थापन करवा अशी मागणी छगन भुजबळ यांनी या पत्राद्वारे अमित शहांकडे केली आहे.

छगन भुजबळ काय म्हणाले?

तेलंगणा राज्यातील संगारेड्डी जिल्ह्यातील तेल्लापूर गावात सामाजिक, शैक्षणिक क्रांतीचे अग्रदूत, राष्ट्रपिता ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्याची ७ फेब्रुवारी रोजी दिवसाढवळ्या हल्ला करण्यात आला. हा हल्ला अत्यंत निंदनीय, गंभीर गुन्हा आहे. या घटनेमुळे कोट्यवाधी समर्थकांच्या भावना दुखावल्या असून सामाजिक समता, शिक्षण आणि मानवतावादी विचारधारेवर आघात आहे, असं छगन भुजबळ म्हणाले.

“महात्मा ज्योतिबा फुले यांनी १८४८ साली देशातील पहिले महिला विद्यालय स्थापित करून स्त्री शिक्षणाचा मार्ग मोकळा करून दिला. त्यांनी सावित्रीबाई फुले यांना देशातील पहिली महिला शिक्षिका म्हणून घडवलं. त्यांनी सती प्रथा, बालविवाह आणि विधवांवर होणाऱ्या अत्याचारांविरोधात आवाज उठवला. तसंच अस्पृश्यता, जाति प्रथांसारख्या सामाजिक गुन्हे ठरवून शूद्र, महिला, शेतकरी, कामगार आणि वंचित वर्गांना संगठित करून सामाजिक क्रांतीचा मार्ग मोकळा करून दिला. सत्यशोधक समाजाची स्थापना करून त्यांनी समतामूलक समाजाचा पाया मजबूत केला”, असंही भुजबळांनी सांगितलं.

“अशा महान समाज सुधारकांच्या प्रतिमेवर हल्ला करणे हे सामाजिक वैमनस्यता आणि अशांतता पसरवण्याचा प्रयत्न आहे. याचा कोणत्याही परिस्थितीत स्वीकार केला जाणार नाही. काही समाजकंटक आजही सामाजिक न्याय, स्त्री शिक्षण आणि समतांच्या प्रतिकांना घाबरलेले आहेत. त्यामुळे माझे तुम्हाला निवदेन आहे की या घटनेची दखल घेण्यात यावी”, असं निवेदन छगन भुजबळांनी केलं आहे.

“या घटनेतील सहभागी असलेल्या दोषींना तत्काळ ताब्यात घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी. विटंबना झालेल्या पुतळ्याच्या जागी नवा पुतळा बसवण्यात यावा. भविष्यात अशा घटना घडू नयेत, याकरात सुरक्षा निश्चित करण्यात यावी. महात्मा जोतिबा फुले यांचा अपमान हा समाज कधीच सहन करणार नाही, त्यामुळे दोषींविरोधात कारवाई करावी”, अशी मागणी छगन भुजबळांनी केली आहे.