Maharashtra MLC Election : महाराष्ट्रातील विधान परिषदेच्या एकूण ११ जागांसाठी आज (१२ जुलै) मतदान प्रक्रिया पार पडत आहे. या जागांसाठी एकूण १२ उमेदवार रिंगणात असल्याने मतफुटीचा धोका असून कोण पराभूत होणार? याबाबत वेगवेगळे अंदाज बांधले जात आहेत. क्रॉस व्होटिंगचा धोका लक्षात घेता बहुतेक पक्षांनी आपापल्या आमदारांना हॉटेलमध्ये ठेवलं आहे. पसंतीक्रमानुसार मतदान कसे करायचे याची रणनीती गुरुवारी दिवसभर आखण्यात येत होती. तसेच शुक्रवारी मतदानपूर्वी याबाबत सूचना दिल्या गेल्या आहेत. दरम्यान, विधान परिषदेच्या या निवडणुकीत काँग्रेसची तीन ते चार मतं फुटणार असं वक्तव्य काँग्रेसचे आमदार कैलास गोरंट्याल यांनी केलं होतं. या वक्तव्यावर ते आजही ठाम आहेत, असं त्यांनी सांगितलं.
विधान भवनाबाहेर गोरंट्याल यांनी काही वेळापूर्वी प्रसारमाध्यमांशी बातचीत केली. यावेळी ते म्हणाले, “मी केलेल्या वक्तव्याचा आमच्या पक्षाला फायदाच झाला आहे. मी काल (११ जुलै) काही आमदारांबाबत केवळ संशय व्यक्त केला, त्यानंतर आज त्यांच्यापैकी काहीजण पक्षाने बोलावलेल्या बैठकीला हजर झाले.”
माझा नेम अचूक लागला : गोरंट्याल
आमदार कैलास गोरंट्याल म्हणाले, “मी काल जे वक्तव्य केलं त्यावर आजही ठाम आहे. मी माझं वक्तव्य बदलणार नाही. मी काल काही आमदारांबाबत संकेत दिले होते आणि त्याचा आज आम्हाला फायदा झाला. मी काही आमदारांबाबत संकेत दिले होते, त्यापैकी दोन आमदार आज आमच्या पक्षाने बोलावलेल्या बैठकीला उपस्थित होते. मी केवळ तीर मारला आणि माझा नेम अचूक लागला. आम्ही आणखी दोन आमदारांची वाट पाहत आहोत. मात्र मतदानापर्यंत काय होईल काय नाही याबाबत आत्ताच अंदाज वर्तवता येणार नाही.”
हे ही वाचा >> “विधानपरिषदेच्या निवडणुकीत राजकीय भूकंप झाला तर…”, रावसाहेब दानवेंचं मोठं विधान
गोरंट्याल म्हणाले, “इतरांनीही काँग्रेसच्या तीन-चार आमदारांबाबत संशय व्यक्त केला होता. मात्र मी कोणाचं नाव दिलं नव्हतं. मी केवळ संकेत दिले होते आणि ज्याचा आम्हाला फायदाच झाला. ज्या आमदारांबाबत मी संशय व्यक्त केला होता ते आमदार बैठकीला आले.
जयंत पाटलांनाही क्रॉस व्होटिंगची भीती
शिवसेनेच्या ठाकरे गटाचे उमेदवार मिलिंद नार्वेकर आणि शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार जयंत पाटील यांच्याकडे पुरेशी मतं नाहीत. त्यामुळे या दोघांपैकी जो नेता अधिक जोर लावेल तो या निवडणुकीत विजयी होईल. जयंत पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांच्या विजयाबाबत विश्वास व्यक्त केला आहे. तसेच ते म्हणाले, मी पहिल्यांदाच मोठ्या पाठिंब्यासह ही निवडणूक लढवत आहे. याआधी मी कमी मतांनी निवडून आलो आहे. परंतु, यावेळी मला शरद पवारांची साथ मिळाली आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे तिन्ही उमेदवार निवडून येतील. मात्र काँग्रेसचे दोन-तीन आमदार क्रॉस व्होटिंग करणार असल्याची माहिती मिळाली आहे.
© IE Online Media Services (P) Ltd