Kailash Mansarovar Yatra missing pilgrims Nepal floods : नेपाळमध्ये नुकत्याच आलेल्या भीषण पुरानंतर कैलास मानसरोवर यात्रेसाठी गेलेल्या महाराष्ट्रातील अनेक नागरिकांचा अद्याप ठावठिकाणा लागलेला नाही. बेपत्ता नातेवाईकांच्या कुटुंबीयांची चिंता वाढत असताना महाराष्ट्र सरकारने राज्यातील गिर्यारोहण क्षेत्रातील अनुभवी व्यक्ती आणि संस्थांची मदत घेण्यास सुरुवात केली आहे. बेपत्ता नागरिकांचा शोध, ओळख प्रक्रिया आणि बचावकार्यात अधिक प्रभावी समन्वय साधण्यासाठी गिर्यारोहकांना पुढे येण्याचे आवाहन करण्यात आले आहे. याबद्दल सविस्तर वृत्त दि इंडियन एक्स्प्रेसने दिले आहे.

महाराष्ट्रातील किती नागरिक नेपाळमध्ये होते?

अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ गिर्यारोहक उमेश झिरपे यांनी सांगितले की, नेपाळमध्ये कैलास मानसरोवर यात्रेसाठी गेलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांची अचूक संख्या उपलब्ध झालेली नाही, त्यामुळे बेपत्ता व्यक्तींची माहिती एकत्रित करण्यासाठी संघटित पद्धतीने प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत.अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाशी संबंधित राज्यभरातील ४० हून अधिक संस्था आणि ५०० पेक्षा जास्त गिर्यारोहक स्वयंसेवक २०१६ पासून विविध बचाव मोहिमांमध्ये सहभागी होत आहेत.

२४ तास हेल्पलाइनची सुविधा

या बचाव प्रयत्नांसाठी महाराष्ट्र गिर्यारोहक बचाव समन्वय केंद्र कार्यरत आहे. नेपाळच्या पर्वतीय भागातील गिर्यारोहकांना आणि संकटात सापडलेल्या नागरिकांना मदत करण्यासाठी या केंद्राला दीर्घकाळाचा अनुभव आहे. महाराष्ट्र गिर्यारोहक बचाव समन्वय केंद्राने कुटुंबीयांना मदत मिळावी यासाठी २४ तास हेल्पलाइन क्रमांक ७६२०२३०२३१ सुरू केला आहे. महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये असलेल्या गिर्यारोहण संस्थांच्या माध्यमातून बेपत्ता नागरिकांच्या कुटुंबीयांशी संपर्क साधला जात आहे.

कुटुंबीय आणि प्रशासनामध्ये दुवा

नेपाळच्या डोंगराळ प्रदेशातील महाराष्ट्र गिर्यारोहक बचाव समन्वय केंद्राचा दीर्घकालीन अनुभव आणि महाराष्ट्रभरातील गिर्यारोहकांचे मोठे जाळे, यामुळे त्यांना राज्यातील दुर्गम भागांतील कुटुंबीय आणि काठमांडूमध्ये सुरू असलेल्या अधिकृत ओळख प्रक्रियेदरम्यान महत्त्वाचा दुवा म्हणून काम करत आहे. बेपत्ता नागरिकांची माहिती एकाच ठिकाणी व्यवस्थित पद्धतीने जमा करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. त्यामुळे कोणत्याही कुटुंबाला योग्य मार्गदर्शनापासून वंचित राहावे लागू नये आणि पुढील कारवाईसाठी राज्य सरकारकडे अचूक माहिती उपलब्ध व्हावी, यासाठी प्रयत्न केले जात आहेत.

मृतांची ओळख पटवण्यासाठी डीएनए चाचणी

नेपाळ सरकार आणि काठमांडूतील भारतीय दूतावासाच्या समन्वयाने मृत व्यक्तींची ओळख पटवण्याची प्रक्रिया सुरू आहे. काही मृतदेहांची छायाचित्रे किंवा उपलब्ध कागदपत्रांच्या आधारे ओळख पटू शकते. मात्र, काही प्रकरणांमध्ये ओळख पटवणे शक्य नसल्यास पहिल्या रक्तसंबंधातील नातेवाईकांच्या डीएनए नमुन्यांच्या आधारे ओळख निश्चित केली जाऊ शकते. ही प्रक्रिया वेळेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची असल्याने कुटुंबीयांनी शक्य तितक्या लवकर आवश्यक माहिती प्रशासनापर्यंत पोहोचवावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

कुटुंबीयांनी काय करावे?

नेपाळमधील आपला नातेवाईक बेपत्ता असल्यास कुटुंबीयांनी नेपाळ पोलिसांच्या https://udb.nepalpolice.gov.np/disasters या अधिकृत आपत्ती पोर्टलवर मृत व्यक्तींची छायाचित्रे आणि माहिती तपासावी. त्याचबरोबर महाराष्ट्र गिर्यारोहक बचाव समन्वय केंद्राने उपलब्ध करून दिलेल्या https://forms.gle/GWXJ3Cs2iYu898Gn7 या गूगल फॉर्ममध्ये बेपत्ता व्यक्तीची माहिती भरावी.

वेबसाइटवर नातेवाईकाची ओळख पटली नसली तरीही कुटुंबीयांनी फॉर्म भरावा, असे आवाहन करण्यात आले आहे. जमा करण्यात आलेली माहिती गोपनीय ठेवली जाणार असून तिचा वापर केवळ बेपत्ता व्यक्तींची ओळख पटवणे आणि मृतदेहांचे अवशेष महाराष्ट्रात परत आणण्याच्या प्रक्रियेसाठी केला जाणार आहे.