Kalachowki Mahaganpati Electrocution breaking news: मुंबईतील गणेशोत्सवाला ग्रहण लागलं असून मध्यरात्री पुन्हा एकदा एक भीषण दुर्घटना घडली आहे. दक्षिण मुंबईतील काळाचौकीचा महागणपती मंडपात विजेचा झटका लागून एका ८ वर्षीय चिमुकलीसह दोघांचा मृत्यू झाला असून चार जण जखमी आहेत. रविवारी पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. पीटीआयने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.
लालबागपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या काळाचौकीचा महागणपतीलाही भक्तांची रिघ लागलेली असते. रविवारची सुट्टी असल्याने शनिवारी रात्रीपासून दक्षिण मुंबईतील गणपती पाहण्याकरता अलोट गर्दी जमली होती. काळाचौकीचा महागणपती पाहण्यासही भक्तांनी गर्दी केली होती. मिळालेल्या माहितीनुसार, पहाटेच्या सुमारास भाविक दर्शनासाठी रांगेत उभे असताना अचानक परिसरात विजेचा तीव्र प्रवाह उतरला. यामुळे रांगेत असलेल्या सहाजणांना विजेचा जोरदार झटका बसला. विजेचा धक्का बसलेल्या सहा जणांना जवळच्या रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले. त्यापैकी दोघांना मृत घोषित करण्यात आले.
मुंबई अग्निशमन दलाला पहाटे २.४२ वाजता या घटनेची माहिती मिळाली. अग्निशमन दलाचे जवान, पोलीस, बेस्ट आणि पालिका प्रभाग अधिकाऱ्यांसह घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी तात्काळ वीजपुरवठा खंडित केला. खबरदारीचा उपाय म्हणून परिसर सीलही करण्यात आला, असं वृत्त इंडियन एक्स्प्रेसने दिलं आहे.
मृतांमध्ये आठ वर्षीय रागिणी यादव आणि ३३ वर्षीय सुजाता यांचा समावेश आहे. महापालिका अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, १९ वर्षीय किरण अकबर नाईक, १९ वर्षीय तन्वी नरेश हांडे आणि १९ वर्षीय साहिल संदीप तारे यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. १२ वर्षीय रुही सिंग या मुलीला गंभीर अवस्थेत आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले आहे.
मोठी गणपीती मूर्ती बसवता मग सुरक्षा का ठेवत नाहीत?
मृत चिमुकलीची मावशी किस्मती यादव म्हणाल्या, “आम्ही दोन वाजता रांगेत उभे राहिलो होतो. २.४० मिनिटांनी ही दुर्घटना घडली. तिथे गर्दी होती म्हणून आम्ही माघारी फिरलो. तिथून घरी जाण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे आम्ही बाजूने निघून जात होतो. मंडपाच्या शेजारीच एक दुकान आहे. मग आम्ही विचार केला की दुकानाजवळ उभं राहूयात. गर्दी कमी झाली की दर्शन घ्यायला जाऊया. त्यांनी लाईट लावली, बाजूलाच मंडप आहे. मंडळाने सुरक्षेची काळजी घ्यायला हवी होती. तुम्ही एवढी मोठी गणपतीची मूर्ती बसवता मग सुरक्षा का ठेवत नाहीत. ज्यांचं बाळ गेलंय, त्यांना तर ते परत मिळणार नाहीय.” असा संताप व्यक्त करण्यात आला.
बेस्ट अधिकाऱ्यांनी केलेल्या प्राथमिक पाहणीत असे आढळून आले की, गणेशोत्सवाच्या रोषणाईसाठी आणि शीतपेयांच्या स्टॉलसाठी त्या ठिकाणी एक तात्पुरते वीज मीटर बसवण्यात आले होते. अधिकाऱ्यांनी सांगितले की, एका स्थानिक वीजतंत्राने वायरिंग आणि एमसीबीचा पुरवठा खंडित केला होता.
लालबाग परिसरात तुफान गर्दी
दरम्यान, लालबाग परिसरात काल तुफान गर्दी झाली होती. सुरक्षा रक्षकांकडून गर्दी नियंत्रणाचं कार्य सुरू होतं. आज रविवार असल्याने मुंबईकरांनी शनिवारीच घराबाहेर पडून प्रसिद्ध गणपती बाप्पांचं दर्शन घेण्याचा प्रयत्न केला. पण गर्दीमुळे अनेकांना दर्शन न घेताच माघारी परतावं लागलं. त्यातच काळाचौकी येथे ही दुर्घटना घडली. जखमींमध्ये ८ ते २० वर्षे वयोगटातील मुलांचा समावेश आहे.
मुंबईतील गणेशोत्सवाला ग्रहण
दरम्यान, गणेशोत्सवाला सुरुवात झाल्यापासून मुंबईत विविध दुर्घटना घडत आहे. भुलेश्वरचा राजाच्या आगमन सोहळ्यात गणपती बाप्पाची मूर्ती कोसळून दोघांचा मृत्यू झाला. तर, मूर्ती कोसळल्याच्या अनेक घटना महाराष्ट्रभर घडल्या. दरम्यान, माझगाव आणि लालबाग-परळ येथे काही समाजकंटकांनी कायदा सुव्यवस्था बिघडवण्याचाही प्रयत्न केल्याच्या घटना घडल्या.
