महापौरपदासाठी सत्ताधारी आघाडीच्या वतीने राष्ट्रवादीचे अभिषेक कळमकर व विरोधी युतीच्या वतीने शिवसेनेचे सचिन जाधव या दोघांनी मंगळवारी पहिल्याच दिवशी त्यांचे उमेदवारी अर्ज दाखल केले. दोन्ही बाजूंनी आपापल्या गाठीला नगरसेवक ठेवल्याने या निवडणुकीतील चुरस वाढली आहे. यात राष्ट्रवादीची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
आमदार संग्राम जगताप यांनी महापौरपदाचा राजीनामा दिल्याने राहिलेल्या एक वर्षासाठी येत्या दि. ८ रोजी महापौरपदाची पुन्हा निवडणूक होत आहे. त्यासाठी मंगळवारपासून दि. ६ पर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करून घेण्यात येत आहे. या निवडणुकीतील दोन्ही प्रमुख प्रतिस्पर्ध्यांनी पहिल्याच दिवशी प्रत्येकी दोन उमेदवारी अर्ज दाखल केले. या उमेदवारी अर्जावरील पुढची प्रक्रिया महापौरपदाच्या निवडणुकीच्या वेळी त्या सभेतच होणार आहे. सभेतच सुरुवातीला उमेदवारी अर्जाची छाननी, नंतर अर्ज मागे घेण्यासाठी वेळ देण्यात येईल. या निवडणुकीसाठी प्राधिकृत अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी अनिल कवडे यांची नियुक्ती झाली आहे.
मंगळवारी सकाळी ११ वाजता राष्ट्रवादीचे उमेदवार अभिषेक कळमकर यांनी त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला. आमदार संग्राम जगताप, नगरसेवक संजय घुले, आरीफ शेख, बाळासाहेब जगताप आदी निवडक पदाधिकारी त्यांच्या समवेत होते. कळमकर यांचे एका अर्जावर संग्राम जगताप व एका अर्जावर महानगरपालिकेतील सभागृह नेते कुमार वाकळे सूचक आहेत. सत्ताधारी आघाडीतील काँग्रेस व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कोणीही नगरसेवक या वेळी उपस्थित नव्हते.
शिवसेनेचे उमेदवार सचिन जाधव यांनी दुपारी १ वाजता त्यांचे उमेदवारी अर्ज दाखल केले. सहकार राज्यमंत्री दादा भुसे यांच्यासह पक्षाचे जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे, पक्षाचे शहरप्रमुख संभाजी कदम, माजी महापौर भगवान फुलसौंदर, मनपातील विरोधी पक्षनेते संजय शेंडगे, पक्षाचे नगरसेवक अनिल शिंदे, दिलीप सातपुते, भाजपचे नगरसेवक सुवेंद्र गांधी आदी या वेळी उपस्थित होते. जाधव यांच्या एका अर्जावर गांधी हेच सूचक आहेत.