हिंगोली: कळमनुरी तालुक्यातील चुंचा गावाजवळ बुधवारी मध्यरात्री दोन मालमोटारांची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत बिहार राज्यातील दरभंगा येथील दोन जणांचा जागीच मृत्यू झाला.
कळमनुरी तालुक्यातील वारंगा-हदगाव राष्ट्रीय महामार्गावर चुंचा शिवारात ८ एप्रिल रोजी रात्री सुमारे १ वाजता दोन वाहनांची (बीआर-०७-जीसी ३२५१ व एमएच-२१-बीएच ५२७१) जोरदार धडक झाली.
दोन्ही वाहने एकाच दिशेने येत असताना हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती आहे. अपघात इतका भीषण होता की वाहनातील खुर्शीद आलम अब्दुल गणी (३६) व अमजद अली मोहम्मद अली (२६, दोघेही रा. नारी, दरभंगा, बिहार) यांचा जागीच मृत्यू झाला.
अपघाताची माहिती मिळताच आखाडा बाळापूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह अडकल्याने जेसीबीच्या सहाय्याने ते बाहेर काढण्यात आले. या प्रकरणी उशिरा रात्री अपघाताची नोंद करण्यात आली आहे.
