गुढीपाडव्याला मुंबईच्या शिवाजी पार्कवर झालेल्या मनसेच्या मेळाव्यात राज ठाकरे यांनी माहीमच्या समुद्रात अनधिकृत बांधकाम करून मजार उभारली जात असल्याचे सांगितले होते. तसेच त्यांनी सांगलीच्या कुपवाड भागातील एक मशीद अनधिकृत असल्याचा दावा करत त्याचे फोटो जाहीर सभेत दाखवले होते. यासह यावर कारवाईचा अल्टिमेटम त्यांनी राज्य सरकारला दिला आहे. यानंतर अवघ्या काही तासात राज्य सरकारने या दोन्ही अनधिकृत बांधकामांवर कारवाई केली आहे. ही दोन्ही बांधकामं आता त्यांनी तिथून हटवली आहेत. या कारवाईनंतर राज ठाकरे आणि राज्य सरकारचं कौतुक होत आहे. दरम्यान, अकोल्याच्या कालीचरण महराजांनीदेखील राज ठाकरे यांच्यावर स्तुतिसुमनं उधळली आहेत. सध्या सोलापूर दौऱ्यावर असलेल्या कालीचरण महाराजांनी आज रुपाभवानी देवीचं दर्शन घेतलं. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. टीव्ही ९ मराठीशी बोलताना ते म्हणाले की, "अशा कामांमध्ये राज ठाकरे यांना आमचा पूर्ण पाठिंबा आहे. अशीच कामं राज ठाकरे यांच्याकडून होत राहिली तर निःसंशयपणे त्यांची खूप प्रगती होईल. सर्व हिंदू त्यांच्या पाठिशी उभे राहतील." हे ही वाचा >> “मी बैल आहे…” महिला मुख्यमंत्र्यांची मागणी करणाऱ्यांना नेमकं काय म्हणाले अभिजित बिचुकले? शिंदे सरकारचं कौतुक दरम्यान, त्यांनी यावेळी राज्य सरकारचं देखील कौतुक केलं. कालीचरण महाराज म्हणाले की, "शिंदे सरकार चांगली कामं करत आहे, हिंदू हिताची काम करत आहे." औरंगाबादचं संभाजीनगर असं नामकरण करण्यात आलं आहे. याबद्दल त्यांनी शिंदे सरकारचं अभिनंदन केलं. तसेच या नामकरणाला विरोध होत आहे, याबद्दल विचारले असता कालीचरण महाराज म्हणाले की, "हाथी चले बाजार कुत्ते भौंके हजार, या नितीनुसार शिंदे सरकारने भुंकणाऱ्या कुत्र्यांकडे लक्ष न देता हिंदू हिताची कामं करत राहावी."