…तर ‘कळणे’चं माळीण व्हायचे दिवस दूर नाहीत! अवैध खाणीचं कळणे गावावर संकट!

सिधुदुर्गातील कळणे गावामध्ये गुरुवारी बाजूच्याच खाणीतून मोठ्या प्रमाणात मलबा आणि पाणी वाहून आलं. कळणेचंही माळीण होतंय की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली.

kalne village mining work
(डावीकडे) कळणेजवळील खाणीचे संग्रहीत छायाचित्र, (उजवीकडे) खाणीचा कडा ढासळल्यामुळे निर्माण झालेली परिस्थिती

माळीण दुर्घटना अजूनही महाराष्ट्रातील जनतेच्या विस्मरणात गेलेली नाही. त्यापाठोपाठ अगदी काही दिवसांपूर्वीच दरड कोसळल्यामुळे तळीये गाव मलब्याखाली गाडलं गेलं. त्यानंतर आता सिंधुदुर्गातल्याच दोडामार्ग येथे असलेल्या कळणे गावावर देखील तसंच संकट घिरट्या घालत आहे. पण हे संकट माळीण किंवा तळीये गावाप्रमाणे निसर्गनिर्मित नसून मानवनिर्मित आहे. त्याचीच सुरुवात गुरुवारी कळणे गावात घुसलेल्या खाणीतल्या राडारोड्यामुळे झाली आहे. त्यामुळे या मानवनिर्मित संकटामुळे कळणे गावाचं माळीण होण्याचे दिवस काही दूर नाहीत, अशी प्रतिक्रिया सामाजिक कार्यकर्ते सतीश लळीत यांनी लोकसत्ता डॉट कॉमशी बोलताना दिली आहे. यासंदर्भात त्यांनी एक फेसबुक पोस्ट टाकून कळणे गावावर येऊ घातलेल्या संकटाची चाहूलच करून दिली आहे.

कळणेमध्ये नेमकं घडतंय काय?

सामाजिक कार्यकर्ते सतीश लळीत यांनी सांगितल्याप्रमाणे, कळणे गावाला लागूनच मोठ्या प्रमाणावर जंगल परिसर आहे. यातच लोहखनिजासाठीचं खाणकाम सुरू आहे. गुरुवारी पडलेल्या पावसामुळे खाणीच्या वरच्या बाजूला असेला उभा कडा ढासळला आणि त्यात साचलेल्या पाण्यासकट हा सगळा मलबा खाणीच्या खालच्या बाजूला असलेल्या गावात घुसला. हा सगळा मलबा आणि पाणी कळणे गावातल्या घरांमध्ये घुसलं. मलब्याचं आणि पाण्याचं प्रमाण जास्त असतं, तर कळणेचंही माळीण होण्याची दाट शक्यता होती.

अवैध खाणकाम आणि अधिकाऱ्यांची मिलीभगत?

वास्तविक कोणत्याही वनक्षेत्रात किंवा इतर कोणत्याही ठिकाणी खाणकाम करायचं असल्यास, सरकारकडून संबंधित जागा खाणकाम करण्यासाठी योग्य आहे का? यासंदर्भात आढावा घेतला जातो. पण कळणे गावाजवळच्या या खाणीला मंजुरी देताना सर्व गोष्टींकडे डोळेझाक करण्यात आली. मानवी वस्ती, पाण्याचे स्त्रोत, वन्यजीव असे काही या खाणीजवळ नाही, असं सांगून पर्यावरणीय आघात अहवाल अनुकूल देण्यात आला. याविरोधात स्थानिक ग्रामस्थांनी आंदोलन देखील केलं. मात्र, ते दडपण्यात आलं, असं सतीश लळीत सांगतात.

नेमकं खाणीत काय झालंय?

कोणत्याही ठिकाणी खाणकाम करताना काही मूलभूत निकष पाळावे लागतात. यातला सर्वात महत्त्वाचा निकष म्हणजे बेंचमार्क टेक्निक. खाणकाम करताना उभे कडे तयार होऊ नयेत आणि त्याअनुषंगाने कळणेमध्ये घडली तशा प्रकारची दुर्घटना घडू नये, यासाठी पायऱ्यांच्या स्वरूपात खाणकाम केलं जातं. पण कळणे गावाच्या बाजूला असणाऱ्या या खाणीमध्ये हा नियमच पाळला गेला नसल्याचं सतीश लळीत यांनी सांगितलं. खाणकामात वरच्या बाजूला उभा कडा तयार झाल्यामुळेच तो कोसळला आणि सगळा मलबा पाण्यासकट गावात घुसला.

माधव गाडगीळ अहवाल बासनात गुंडाळला!

दरम्यान, अशा प्रकारच्या कामांमध्ये कशा पद्धतीने गोष्टी घडतायत आणि घडायला हव्यात, यासंदर्भातल्या बाबींचा उल्लेख माधव गाडगीळ यांच्या समितीने तयार केलेल्या अहवालात करण्यात आला होता. मात्र, सरकारने हा अहवालच बासनात बांधला. इको सेन्सिटिव्ह झोन जाहीर करताना नियमांना धाब्यावर बसवण्याचंच धोरण राबवण्यात आलं. त्यामुळेच कळणे गावात ही मानवनिर्मित दुर्घटना घडली आहे. ती निश्चितच टाळता आली असती, असं देखील सतीश लळीत यांनी स्पष्ट केलं आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Kalne village in sindhudurga district face situation like malin due to mining nearby village pmw