राहाता: भोंदू अशोक खरातची फरार पत्नी कल्पना खरात हिने वकिलांमार्फत अटकपूर्व जामिनासाठी दाखल केलेला अर्ज जिल्हा व सत्र न्यायालयाने फिर्यादी व आरोपींचे वकील तसेच पोलिसांचा युक्तिवाद ऐकून घेत फेटाळला. त्यामुळे कल्पना खरातच्या अडचणीत वाढ झाली आहे. शिर्डीतील चार एकर भूखंड खरेदीप्रकरणी जमीन व्यवहाराच्या नावाखाली कोट्यवधींची फसवणूक व सावकारकीच्या कायद्यानुसार रावसाहेब गोंदकर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार भोंदू अशोक खरात, त्याची पत्नी कल्पना खरात व इतर ३ अशा एकूण ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कल्पना खरात ही शिर्डीतील गुन्ह्यात आरोपी असून तिने राहाता सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. फिर्यादीचे वकील शुभम गोंदकर, सरकारी वकील सतीश पानगव्हाणे तसेच बचाव पक्षाचे वकील प्रशांत गिरी यांनी न्यायालयात युक्तिवाद केला. बचाव पक्षाचे वकील गिरी यांनी सांगितले की, रावसाहेब गोंदकर यांच्या जमीन खरेदीसंदर्भातील कोणत्याही बैठकीत कल्पना खरात उपस्थित नव्हत्या.

त्यामुळे अशोक खरात यांच्या कथित कृत्यांसाठी त्यांच्या पत्नीला जबाबदार धरता येणार नाही तसेच कल्पना खरात यांच्या बँक खात्यांचा वापर पतीकडून होत असल्याने आर्थिक व्यवहार त्यांच्या माहितीत होतेच असे म्हणता येणार नाही. त्यांच्या पतीविरुद्धच्या आरोपात कल्पना खरातचा सहभाग नाही. कुटुंबाची जबाबदारी, मुलांचे संगोपन आणि पोलिसांना आवश्यक कागदपत्रे आधीच उपलब्ध असल्यामुळे कोठडीची गरज नसल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच तपासात सहकार्य करण्याची आणि रोज हजेरी लावण्याची तयारी दर्शवली.

सरकारी पक्षाने मात्र या दाव्यांना विरोध करताना सांगितले की, ‘पॉवर ऑफ अटर्नी’ करताना कल्पना खरात स्वतः उपस्थित होत्या. संबंधित कागदपत्रांवर त्यांच्या स्वाक्षऱ्या, अंगठ्याचे ठसे आणि छायाचित्रे आहेत. याशिवाय व्याज व्यवहारात २ टक्के रक्कम त्यांना देण्याचा उल्लेख असल्याने त्यांना व्यवहाराची माहिती नव्हती हा दावा ग्राह्य धरता येत नाही, तसेच सावकारकी परवान्याबाबत प्रश्न उपस्थित करत मृत जितेंद्र शेळके यांच्या साक्षीचाही संदर्भ दिला.

फिर्यादी रावसाहेब गोंदकर यांचे वकील शुभम गोंदकर यांनी नोंदणीकृत मुखत्यारपत्र आणि विविध माध्यमांतून झालेल्या आर्थिक व्यवहारांचा दाखला देत कल्पना खरात यांचा सहभाग असल्याचे सांगितले. पत्नीच्या खात्याचा पतीकडून वापर होणेही गैर असल्याचे त्यांनी नमूद केले. तपास अधिकारी निवांत जाधव यांनी न्यायालयात सांगितले की, कल्पना खरात कोणतीही नोकरी करत नसतानाही त्यांच्या खात्यातून सुमारे ७ कोटी रुपयांचे व्यवहार झाले आहेत.

या रकमेचा स्रोत तपासणे आवश्यक आहे. तपासात ५७ मालमत्ता समोर आल्या असून त्यापैकी सुमारे ४० टक्के मालमत्ता कल्पना खरात यांच्या नावावर असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे त्यांना व्यवहाराची माहिती नसल्याचा दावा ग्राह्य धरता येणार नाही असे त्यांनी न्यायालयासमोर मांडले. कल्पना खरातच्या खात्यातून पैसे गेल्याचे आरोपीच्या वकिलाने मान्य केले.

कल्पना खरात प्राप्तिकर विभागाला संपूर्ण कर भरते, शिवसंकल्प हार्डवेअर हा तिचा व्यवसाय आहे. असा युक्तिवाद आरोपीचे वकील प्रशांत गिरी यांनी केला. कल्पना खरातच्या विरहित जमिनीचा व्यवहार झालेला आहे. त्यामुळे यामध्ये आरोपी करू नये. कल्पना खरातच्या विरोधात याआधी कुठलाही फसवणुकीचा गुन्हा दाखल नाही, असा युक्तिवाद आरोपीचे वकील प्रशांत गिरी यांनी केला.

शोध घेण्याचे पोलिसांपुढे आव्हान

दरम्यान, ३१ मार्चपासून फरार असलेल्या कल्पना खरातचा शोध घेणे शिर्डी पोलिसांसमोर मोठे आव्हान ठरत आहे. कल्पना खरात पोलिसांसमोर शरण येणार का, की उच्च न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी धाव घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.