अकोले: पावसाळ्यात निसर्गाच्या कुशीत ढग धुक्यात हरवलेल्या कळसूबाई, हरिश्चंद्रगड या शिखरांचे सौंदर्य अधिकच खुलते. पण या सौंदर्याचा आस्वाद घेताना बेजबदारपणे वागणाऱ्या ८ पर्यटकांच्या दृष्टीने या शिखरावरील रात्रीचे काही तास जीवघेणे ठरले. प्रतिकूल नैसर्गिक वातावरणातही वन कर्मचारी मदतीला धावले म्हणून अनर्थ घडला नाही आणि वाट चुकलेले हे पर्यटक सुखरूप परतले.
मुंबईतील चार पर्यटक कळसूबाई शिखरावर जाण्यासाठी बुधवारी आले होते. विशेष माहिती नसताना तसेच कोणी वाटाड्या बरोबर न घेता उत्साहात बारी येथून शिखराकडे ते निघाले. सभोवतालचा हिरवागार निसर्ग पहात त्यात ते हरखून गेले. दिवसभर शिखरावर भटकंती करताना त्यांना वेळेचे भान राहिले नाही. संध्याकाळी मुसळधार पाऊस सुरू झाला. जोडीला थंडगार वारा, सर्वत्र दाट धुके पसरले. अंधार दाटू लागला. पर्यटक सैरभैर झाले. त्यांना वाट सापडेना. सुदैवाने मोबाईलला रेंज होती.
त्यांनी ११२ क्रमांकाशी मदतीसाठी संपर्क केला. राजूर पोलिसांनी वन्यजीव विभागाला माहिती दिली. वनपरिक्षेत्र अधिकारी रुपेश गावित व वनपरिमंडळ अधिकारी शंकर लांडे यांचे मार्गदर्शनाखाली वनरक्षक चंद्रकांत तळपाडे, वनकर्मचारी अजय गांगड व दिनकर उघडे यांचे पथक पर्यटकांचा शोध घेऊ लागले. त्यावेळी रात्रीचे साडेसात वाजले होते. पाऊस, प्रचंड धुके, दाट अंधार, निसरड्या वाटा अश्या स्थितीत हे पथक कळसूबाई शिखराकडे निघाले. मोबाईल जीपीएस वरून पर्यटकांचे स्थान शोधले. अखेर रात्री १०.३० च्या सुमारास पांजरे परिसरातील कळसूबाई शिखराच्या मागील पठार भागात पर्यटक सापडले.
पर्यटकात तीन महिला होत्या. विशेष म्हणजे चार पैकी फक्त एका पर्यटकाकडे रेनकोट होता. पर्यटक घाबरलेले, पूर्ण भिजलेले व थंडीने कुडकुडत होते. दोघा वनकर्मचाऱ्यांनी स्वतःचे रेन कोट त्यांना दिले. स्वतः पावसात भिजत त्यांनी चिखल, अंधार धुके यांचा सामना करीत पहाटे २ वा. सुखरूप पांजरे येथे आणले.
दुसऱ्या दिवशीही पुनरावृत्ती
कळसूबाईवर जे घडले त्याचीच पुनरावृत्ती काल, गुरुवारी हरिश्चंद्रगडावर झाली. मुंबई येथील शिवनिक मिश्रा, सुजय तिवारी, करुणा शहा, शिवांगी मिश्रा हे चार पर्यटक शुक्रवारी हरिश्चंद्रगदावर आले होते. खिरेश्वरमार्गे गडावर दिवसभर भटकंती केली. वेळेचे भान राहिले नाही, त्यातच वाट चुकले, अंधार दाटला. सर्वत्र धुके होते. वाट सापडत नव्हती. सर्वजण खूप घाबरले. त्यांचे सुदैवाने नेटवर्क आले आणि रात्री ८.३०-९ सुमारास त्यांनी ११२ क्रमांकावर संपर्क साधून हरिश्चंद्रगडावर चुकल्याचे सांगितले. सहायक पोलीस निरीक्षक किशोर पवार यांनी वनपरिक्षेत्र अधिकारी प्रतिभा सोनवणे यांच्याशी संपर्क साधून माहिती दिली. पोलिस कर्मचारीही हरिश्चंद्रगडकडे पाठविले. वनक्षेत्रपाल सोनवणे यांनी कोथळे वनपाल आर. जी. बुळे, वनरक्षक जी. आर. आढळ यांना सूचना केल्या. तोलारखिंड चेक नाका वन कर्मचारी, पोलिस व ग्रामस्थांच्या मदतीने बुळे व आढळ यांनी मदत पथके तयार केली. पाऊस धुके अंधार याच्याशी सामना करीत अखेर ११ च्या सुमारास शोध पथकाला पर्यटक सापडले. रात्रीच्या किर्र अंधारात वाटचाल करीत तोलारखिंड मार्गे या चार पर्यटकांना पहाटे ३.३० वा. खिरेश्वर येथील त्यांच्या गाड्यांपर्यंत सुखरूप पोहचविण्यात आले.
