“काळूबाईच्या नावानं चांगभलं”च्या जयघोषात यात्रेस प्रारंभ

गडावर शासकीय महापूजा पार पडली ; यात्रेवर थंडी धुक्याचे सावट

‘काळूबाईच्या नावानं चांगभलं ‘ च्या जयघोषात मांढरदेवी (ता.वाई)गडावरील काळूबाईची यात्राला आज (शुक्रवार)मोठ्या उत्साहात सुरूवात झाली. यात्रेसाठी राज्यभरासह कर्नाटक राज्यातील मोठ्या प्रमाणात भाविक गडावर दाखल झाले आहेत.यात्रेच्या नियोजनासाठी प्रशासन कार्यरत असून यात्रा सुरळीत पार पाडावी यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त आहे. शिवाय, खासगी सुरक्षा रक्षक देखील जबाबदारी पार पाडत आहेत. आज यात्रेवर ढगाळ वातावरणास, थंडी व धुक्याचे सावट जाणवले.

पौष पौर्णिमा हा यात्रेचा मुख्य दिवस असल्याने आज देवीची सुवर्ण अलंकारासह आकर्षक पूजा बांधण्यात आली. मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई व फुलांची सजावट करण्यात आली आहे. मांढरदेव देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष तथा जिल्हा व सत्र न्यायाधीश आर.डी. सावंत, ट्रस्टचे अध्यक्ष व अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश डी.आर शेट्टी, प्रांताधिकारी संगिता राजापूरकर चौगुले, तहसीलदार रणजीत भोसले, पोलीस उपअधीक्षक (वाई )अजित टिके, पोलीस निरीक्षक आनंदराव खोबरे, ट्रस्टचे विश्वस्त मिलिंद ओक, महेश कुलकर्णी, अतुल जोशी, सचिव रामदास खामकर यांच्या हस्ते व प्रमुख उपस्थितीत देवीची शासकीय पूजा पहाटेच्या सुमारास झाली.

यात्रेत भाविकांना दर्शन सुलभ होण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे. त्याच्या नियोजनासाठी देवस्थान ट्रस्ट, ग्रामपंचायत, यात्रा समिती,तसेच प्रशासनाच्या विविध विभागांचे कर्मचारी यांनी गडावर तळ ठोकला आहे. मांढरदेवकडे येणाऱ्या भोर येथील अबडखिंड घाट व वाई मार्गावर विविध पथकांची नजर आहे.

जादूटोणा प्रकारांना आळा घालण्यासाठी विशेष पथकं तैनात –
यात्राकाळात पशूहत्या व झाडांवर लिंबू खिळे ठोकून केल्या जाणाऱ्या जादूटोणा प्रकारांना आळा घालण्यासाठी कर्मचाऱ्यांची विविध पथकं लक्ष ठेवून आहेत. यात्रेच्या अनुषंगाने पशुसंवर्धन व पोलिस विभागाची पथकं वाहनांची तपासणी करत आहेत. पशू व कोंबड्यांना यात्रेच्या ठिकाणी आणले जाऊ नयेत, याची देखील विशेष खबरदारी घेतली जात आहे.

गुरुवारी रात्री झाला देवीचा जागर –
देवीचा जागर गुरूवारी रात्री झाला. या जागराला देवीची मानाची पालखी गावातून वाजत गाजत मंदिरात आली होती. त्यानंतर काल रात्री देवीची छबिना मिरवणूक गावातून काढण्यात आली होती. ढोल-ताशा गजरात अनेक भाविकांच्या उपस्थितीत देवीची गाव प्रदक्षिणा पूर्ण होऊन पहाटेच्या सुमारास पालखी मंदिराच्या पारावर आली आणि भाविकांची एकच झुंबड दर्शनासाठी उडाली. त्यानंतर पहाटे साडेपाचच्या दरम्यान प्रशासनाच्यावतीने मुख्य पुजा झाली. २००५ मध्ये घडलेल्या दुर्घटनेनंतर या गडावरील संपूर्ण यात्रा ही शासकीय यंत्रणेकडून पार पाडली जाते.शनिवारी उत्तर यात्रा आहे, पण यानंतर यात्रा पुढे एक महिना चालते.

अंधश्रद्धेला खतपाणी घालणाऱ्या वस्तूंना गडावर बंदी –
मांढरदेवकडे जाणाऱ्या मार्गावर पोलीस यंत्रणेसह विविध पथकं तैनात करण्यात आली, असून प्रत्येक वाहनांची कसून तपासणी केली जात आहे. गडावर कोंबड्या, बकऱ्या आणि वाद्य नेण्यास परवानगी नसल्यामुळे असे साहित्य सापडल्यास ते जप्त करण्याचे आदेश दिले गेले आहेत. अंधश्रद्धेला खत पाणी घालणारे खिळे, ब्बिबे, लिंबू, चामड्याची छोटी चप्पल आदी वस्तूंची या ठिकाणी तपासणी होत आहे. तर या वस्तू विक्री करणाऱ्यांवर देखील कारवाई करण्यात येत आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Kalubai yatra festival start today msr

Next Story
‘बुद्धिस्ट सर्किट’ विकासातून पर्यटनास चालना