KDMC Politics MNS Supports Shivsena: कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेतील सत्तास्थापनेबाबत मोठं नाट्य सध्या पाहायला मिळत आहे. ज्या भाजपा व शिंदे गटाविरोधात दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र येत दंड थोपटले होते, त्याच महायुतीतील शिंदे गटाला मनसेनं पाठिंबा जाहीर केला आहे. विशेष म्हणजे भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी शिंदे गटानं मनसेच्या नगरसेवक गटाचा पाठिंबा घेतला आहे. त्यामुळे ठाकरे ब्रँडचं काय झालं? शिंदेंच्या विरोधात लढून पुन्हा त्यांनाच पाठिंबा कसा दिला? भाजपा व शिंदे गटातला कल्याण-डोंबिवलीतील कलह राज्यातील नेत्यांनी दुर्लक्षित केला का? असे अनेक प्रश्न उपस्थित होत असताना आता राज ठाकरेंबाबत संभ्रमाचं वातावरण निर्माण झालं आहे.

कल्याण-डोंबिवलीमध्ये नेमकं काय घडलं?

नुकत्याच पार पडलेल्या कल्याण-डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीत भाजपाचे ५०, शिंदेंच्या शिवसेनेचे ५३ नगरसेवक निवडून आले. सत्तास्थापनेसाठी ६३ नगरसेवकांचं पाठबळ असणं आवश्यक असताना ठाकरे गटाच्या ११ नगरसेवकांना फोडण्याचे प्रयत्न भाजपा व शिंदे गट अशा दोघांकडून सुरू झाल्याचं दिसून आलं. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे काही नगरसेवक मनसेच्या गोटात सामील झाले असून मनसेनं शिंदेंच्या शिवसेनेला कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत सत्तास्थापनेसाठी पाठिंबा दिला आहे. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेत उद्धव ठाकरेंच्या खांद्याला खांदा लावून प्रचारात उतरलेल्या राज ठाकरेंच्या पक्षानं कल्याण-डोंबिवलीमध्ये मात्र ठाकरेंचे कट्टर विरोधक एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला पाठिंबा दिल्याचं दिसून येत आहे.

राजू पाटील म्हणतात, “राज ठाकरेंना हे सगळं माहिती आहे”

दरम्यान, राज ठाकरेंना कल्याण-डोंबिवलीमधील घडामोडींबाबत कल्पना दिल्याची माहिती मनसेचे स्थानिक नेते राजू पाटील यांनी पाठिंब्याबाबत उल्लेख करताना दिली. “राज ठाकरेंना आम्ही केडीएमसीतील गणित सांगितले, तेव्हा त्यांनी आम्हाला स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याचे अधिकार दिले. बाहेर राहून आम्ही आमच्या पाच नगरसेवकांनाही न्याय देऊ शकलो नसतो. सत्तेत राहून आम्ही त्यांच्यावर अंकुश ठेवू, विकासाच्या कॉमन मिनिमम प्रोग्रामवर काम करू”, असं राजू पाटील म्हणाले. विकासासाठी शिंदेंच्या शिवसेनेला पाठिंबा दिल्याचंही राजू पाटील यांनी यावेळी सांगितलं.

..पण संजय राऊत म्हणतात, राज ठाकरेंना कल्पना नाही

दरम्यान, राजू पाटील यांनी केलेला दावा संजय राऊतांनी खोडून काढला आहे. राज ठाकरेंना कल्याण-डोंबिवलीबाबत कल्पना नव्हती, असं संजय राऊत म्हणाले आहेत. “त्यांच्या पक्षाकडून सांगितलं गेलं की स्थानिक पातळीवर हा निर्णय झाला असून आम्हाला त्याची कल्पना नाही. आम्ही अंतर्गत चर्चा करू. कल्याण-डोंबिवलीत जे घडलं ती मनसे पक्षाची भूमिका नाही असं त्यांनी सांगितलं. राज ठाकरेंनाही ती भूमिका मान्य नाही हे त्यांच्याशी चर्चा झाल्यावर आमच्या लक्षात आलं”, असं संजय राऊत म्हणाले.

“…तर मग तिथे आधी युती करायची नव्हती”

“शह-काटशहाच्या राजकारणात नीतीमत्ता ओंडक्यासारखी वाहून जाऊ नये एवढंच आमचं म्हणणं आहे. जर स्थानिक लोकांना अशी युती करायची होती, तर तुम्ही कल्याण-डोंबिवलीत आमच्या शिवसेनेबरोबर युती करायला नको होती. आमची शिंदे गटाबाबत कठोर भूमिका आहे. त्यांनी महाराष्ट्राच्या पाठीत खंजीर खुपसला. दोन पर्याय होते. तिथे शिंदे व भाजपा एकत्र येऊ शकतात. इतरांना त्यात घुसायचं कारण नव्हतं. हे माझं मत आहे. पण त्यांनी तो निर्णय घेतलाय. त्यावर आम्ही अंतर्गत चर्चा करू”, असंही संजय राऊत म्हणाले.

उद्धव ठाकरेंना आधीपासून सर्व माहिती होतं?

दरम्यान, उद्धव ठाकरेंना पहिल्या दिवसापासून या सर्व घडामोडींची कल्पना होती, असा मोठा दावा संजय राऊत यांनी केला आहे. “मनसेच्या श्रीकांत शिंदेंशी बैठकांबाबत उद्धव ठाकरेंनाही माहिती होती. पहिल्या दिवसापासून त्यांच्याकडे ही माहिती होती. आताही पडद्यामागे काय चाललंय याची माहिती उद्धव ठाकरेंकडे आहे”, असं संजय राऊत म्हणाले.