दापोली – रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यात पर्यटनासाठी आलेल्या कुटुंबातील १३ वर्षीय मुलीचा अचानक मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. आंचल मदन सकपाळ (वय १३) असे मृत मुलीचे नाव असून ती ठाणे जिल्ह्यातील कल्याण परिसरातील रहिवासी होती.
सकपाळ कुटुंब २५ डिसेंबर रोजी दापोली येथे पर्यटनासाठी आले होते. आंजर्ले परिसरातील एका रिसॉर्टमध्ये मुक्काम करून शनिवारी (२७ डिसेंबर) सकाळी परतीच्या प्रवासाला निघण्याची तयारी सुरू असताना आंचल झोपेतून उठली नाही. कुटुंबीयांनी तिला तातडीने आंजर्ले येथील रुग्णालयात, तेथून दापोली उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले; मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर तिला मृत घोषित केले.
आंचल ही कल्याण येथील सेंट थॉमस विद्यालयात इयत्ता आठवीत शिकत होती. शुक्रवारी रात्री जेवणानंतर ती काही वेळ कुटुंबासोबत खेळली होती, अशी माहिती कुटुंबीयांनी दिली. मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. प्राथमिक वैद्यकीय अहवालानुसार अन्नातुन वीष बाधा झाल्याने मृत्यू झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला असून, व्हिसेरा तपासणीसाठी पाठविण्यात आला आहे. अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे कारण निश्चित होणार आहे.
घटनेची माहिती मिळताच दापोली नगराध्यक्ष कृपा घाग, नगरसेविका प्रिती शिर्के यांच्यासह सामाजिक कार्यकर्त्यांनी रुग्णालयात भेट देऊन कुटुंबीयांना धीर दिला. दापोली पोलीस निरीक्षक महेश तोरस्कर आणि सहाय्यक निरीक्षक यादव यांनीही रुग्णालयात भेट देत चौकशी सुरू केली. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला असून, या प्रकरणी दापोली पोलीस अधिक तपास करीत आहेत.
