​सावंतवाडी: कणकवली नगरपंचायत निवडणुकीच्या तोंडावर ‘शहर विकास आघाडी’ स्थापन होण्याची चर्चा सुरू असतानाच, महायुतीमध्ये जोरदार राजकीय रस्सीखेच सुरू झाली असल्याचे चित्र कणकवलीत दिसत आहे. भाजपच्या शहर कार्यालयासमोर लावलेल्या बॅनरवरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आमदार निलेश राणे यांचे फोटो हटवण्यात आल्याने निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापले आहे.

कणकवली नगरपंचायत निवडणुकीत महायुती होणार की नाही, याबाबत अनिश्चितता असतानाच हा प्रकार घडला आहे. काल (सोमवारी) भाजप शहर कार्यालयासमोर कमानीवर झळकलेल्या बॅनरवर महायुतीच्या प्रमुख नेत्यांचे फोटो होते. मात्र, आज (मंगळवारी) याच ठिकाणी झळकलेल्या नव्या बॅनरवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा फोटो कायम ठेवून, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आमदार निलेश राणे यांचे फोटो हटवण्यात आले आहेत. या बदलामुळे कणकवलीत महायुतीच्या भवितव्याबद्दल उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे.

​भाजप कार्यालयाच्या कमानीवरील बॅनरवरून दोन महत्त्वाच्या नेत्यांचे फोटो काढल्याने, महायुतीमधील स्थानिक गटबाजी उघड झाली असून, यामुळे भाजप-शिवसेना (शिंदे गट) आणि भाजप-राष्ट्रवादी (अजित पवार गट) यांच्यातील राजकीय समीकरणांवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात महायुतीच्या फॉर्म्युल्याला अंतिम रूप देण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. खासदार नारायण राणे यांनी यापूर्वीच महायुतीबाबत चर्चा केली जाईल असे संकेत दिले होते.

​यानुसार, सावंतवाडी येथे आमदार दीपक केसरकर यांच्या कार्यालयात भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब आणि सचिन वालावलकर यांच्यात महत्वपूर्ण बैठक झाली. आमदार दीपक केसरकर यांनी पत्रकारांशी बोलताना, “उद्या बुधवारी दुपारपर्यंत महायुतीबाबतचा मसुदा तयार होईल,” अशी आशा व्यक्त केली आहे.

कणकवलीतील बॅनरवरील फोटो हटवण्याबाबत आमदार दीपक केसरकर यांना विचारले असता, त्यांनी या प्रकरणाची आपणास कोणतीही माहिती नसल्याचे स्पष्ट केले. मात्र, महायुतीच्या नेत्यांचे फोटो अचानक बॅनरवरून हटवल्याच्या या घटनेमुळे कणकवली नगरपंचायत निवडणुकीतील राजकीय संघर्ष अधिक तीव्र होण्याची चिन्हे आहेत.