बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत सध्या तिच्या ‘थलायवी’ या नव्या चित्रपटामुळे पुन्हा खूप चर्चेत आहे. दरम्यान, कंगनाच्या या चित्रपटाला तमिळ आणि तेलगू भाषांसाठी चित्रपटगृहं मिळाली. पण, हिंदीसाठी कोणतंही चित्रपटगृह मिळालं नाही. म्हणूनच, कंगना रणौत चांगलीच संतापली आहे. याच पार्श्वभूमीवर, आता कंगनाने थेट महाराष्ट्र सरकारला फटकारलं आहे. मुंबईतील चित्रपटगृहं सुरु न केल्याबद्दल कंगनाने महाराष्ट्र सरकारवर निशाणा साधला आहे. जगातील सर्वोत्तम मुख्यमंत्री असा उल्लेख करत कंगना राणौतने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर उपहासात्मक टीका केली आहे.

कंगना रणौत ही सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय आहे. त्याचप्रमाणे, विविध विषयांवर अनेकदा ती व्यक्त होत असते. बऱ्याचदा कंगनाचा रोख हा शिवसेना, महाराष्ट्र सरकार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरच असलेला दिसतो. अलीकडेच कंगनाने महाराष्ट्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. यामागचं कारण असं कि, महाराष्ट्र सरकारने अजून मुंबईत चित्रपटगृहं उघडलेली नाहीत. त्यामुळे, चित्रपटसृष्टीला याचा फार मोठा त्रास सहन करावा लागत असल्याचा कंगनाचा आरोप आहे.

“जगातील सर्वोत्तम मुख्यमंत्री”

कंगनाने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये कंगनाने लिहिलं आहे कि, “महाराष्ट्र सरकार चित्रपटगृहं संस्कृती पूर्णपणे नष्ट होईपर्यंत चित्रपटगृहं बंदच ठेवणार आहे. खरंतर चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होण्यासाठी भरपूर चित्रपट आहेत. मात्र, कोणालाही कलाकार, निर्माते, वितरक आणि थिएटर ऑपरेटर्सची चिंता नाही. राज्य सरकारचा चित्रपट उद्योगाकडे पाहण्याचा असमान दृष्टिकोन यातून स्पष्टपणे दिसून येतो. इतकं असूनही बॉलिवूडने मौन पाळण्याचा निर्णय घेतला आहे. पण कोणीही जगातील सर्वोत्तम मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारू शकत नाही.”

‘थलायवी’ लवकरच नेटफ्लिक्सवर

खरंतर कंगनाने यापूर्वी अनेक वेळा या विषयावर भाष्य केलं आहे. अनेक राज्यांमध्ये ५०% क्षमतेने चित्रपटगृहं उघडण्यास परवानगी मिळाली आहे. परंतु महाराष्ट्र सरकारने त्यासाठी अद्याप मान्यता दिलेली नाही. यामुळे, आपला ‘थलायवी’ चित्रपटही हिंदी प्रेक्षकांना पाहता येत नसल्याचं म्हणत कंगनाने आपला राग व्यक्त केला आहे. दरम्यान, ‘थलायवी’ हा लवकरच हिंदीत नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.