सावंतवाडी: कणकवली शहरातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक सुशांत दळवी यांचा मृतदेह आज संशयास्पद स्थितीत आढळून आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. शहरातील मुरेडोंगरी परिसरातील मोहनमळा येथे हा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात सापडला असून, प्राथमिक अंदाजानुसार हा घातपाताचा प्रकार असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, सुशांत दळवी यांचा मृतदेह मोहनमळा परिसरातील निर्जन स्थळी आढळून आला. त्यांच्या डोक्याला गंभीर इजा झालेली असून, जखमेचे स्वरूप पाहता त्यांच्यावर बंदुकीतून गोळी झाडण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. मृतदेहापासून काही अंतरावर रक्ताचे डागही विखुरलेले पाहायला मिळाले, ज्यामुळे या घटनेमागे घातपात असण्याची शक्यता बळावली आहे.
पोलीस तपास आणि फॉरेन्सिक टीम दाखल
घटनेची माहिती मिळताच कणकवली पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले आहेत. पोलिसांनी परिसराची नाकेबंदी केली असून पंचनाम्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. घटनेचे गांभीर्य ओळखून फॉरेन्सिक टीमलाही पाचारण करण्यात आले असून, तांत्रिक पुराव्यांच्या आधारे तपास चक्रां वेगाने फिरवली जात आहेत.
सुशांत दळवी यांच्यासारख्या व्यावसायिकाचा अशा प्रकारे संशयास्पद मृत्यू झाल्याने कणकवलीसह सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बांधकाम क्षेत्रात आणि व्यापारी वर्गात भीतीचे वातावरण पसरले आहे. हा प्रकार आत्महत्या आहे की हत्या, याचा उलगडा पोलीस तपासानंतरच स्पष्ट होणार आहे.
