सावंतवाडी : कणकवली शहरातील नरडवे मार्गावर सोमवारी सकाळी एक भीषण अपघात घडला. धावत्या मारुती इस्टिलो कारने अचानक पेट घेतल्याने गाडी जळून खाक झाली. सुदैवाने, गाडीतील प्रवाशांनी प्रसंगावधान राखत बाहेर उड्या घेतल्याने मोठा अनर्थ टळला आणि सर्व प्रवासी बालंबाल बचावले.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित झेन इस्टिलो कार कणकवलीहून कनेडीच्या दिशेने जात होती. नरडवे मार्गावरील बांधकरवाडी बस थांब्याजवळ पोहचली असता, कारमधून अचानक धूर निघू लागला आणि काही क्षणातच गाडीने पेट घेतला. ही कार ‘आउटफिटेड’ (बाहेरून बसवलेले) सीएनजी किट असलेली होती. गॅसमुळे आगीने रौद्र रूप धारण केले आणि पाहता पाहता संपूर्ण कार आगीच्या गोळ्यात वेढली गेली.
आजूबाजूच्या नागरिकांनी तातडीने धाव घेऊन आग विझवण्याचा प्रयत्न केला, मात्र आगीची तीव्रता इतकी भीषण होती की काही वेळातच कारचा सांगाडा उरला. सुदैवाने, या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. प्राथमिक अंदाजानुसार, सीएनजी किटमध्ये झालेल्या बिघाडामुळेच ही आग लागली असावी, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
