सावंतवाडी : मुंबई – गोवा महामार्गावरील ओसरगाव (ता. कणकवली) येथील टोलनाका मे महिन्यापासून कार्यान्वित करण्याच्या हालचाली केंद्र सरकारने सुरू केल्या आहेत. मात्र, या टोलवसुलीस सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघ आणि टोलमुक्त कृती समितीने आक्रमक विरोध दर्शविला आहे. “सिंधुदुर्गातील सर्व वाहनांना टोलमाफी द्या किंवा ओसरगाव येथे पर्यायी राज्य मार्ग तयार करा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल,” असा इशारा समितीच्या वतीने देण्यात आला आहे.
कणकवली येथील शासकीय विश्रामगृहात व्यापारी महासंघ आणि टोलमुक्त कृती समितीची संयुक्त बैठक पार पडली. या बैठकीला महासंघाचे अध्यक्ष संजय सावंत, कृती समितीचे अध्यक्ष द्वारकानाथ घुर्ये, राजू जठार, ॲड. नंदन वेंगुर्लेकर, ॲड. नितीन म्हापणकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.
महामार्ग नव्हे रुंदीकरण झाले आहे असे त्यांनी सांगितले.हा नवीन महामार्ग नसून केवळ अस्तित्वात असलेल्या रस्त्याचे रुंदीकरण करण्यात आले आहे. त्यामुळे येथे टोल वसुली करणे तांत्रिकदृष्ट्या चुकीचे असल्याचे सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाचे म्हणणे आहे.
नितीन गडकरींच्या आश्वासनाचा विसर: कुडाळ येथील कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी हा महामार्ग टोलमुक्त असेल अशी ग्वाही दिली होती, याची आठवण ॲड. नंदन वेंगुर्लेकर यांनी करून दिली.ओसरगाव टोलनाक्यामुळे जिल्ह्याचे दोन भाग पडत आहेत. जिल्हा रुग्णालय आणि मुख्यालयात जाणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांना, तसेच नांदगाव येथील प्रस्तावित मार्केट यार्डमध्ये माल नेणाऱ्या शेतकरी व व्यापाऱ्यांना याचा मोठा आर्थिक फटका बसणार आहे.
यापूर्वी तीन वेगवेगळ्या एजन्सीमार्फत टोल सुरू करण्याचे प्रयत्न झाले, मात्र जनतेच्या विरोधामुळे ते यशस्वी झाले नाहीत. आता चौथ्यांदा एजन्सी नियुक्त करून टोल लादण्याचा प्रयत्न होत आहे,असा दावा यावेळी करण्यात आला.
टोल वसुलीच्या या प्रश्नावर येत्या दोन-तीन दिवसांत सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांच्याशी सविस्तर चर्चा केली जाणार आहे. या चर्चेनंतर आंदोलनाची पुढील दिशा निश्चित केली जाईल, अशी माहिती व्यापारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष संजय सावंत यांनी दिली. या बैठकीला विनायक मेस्त्री, मनोज वालावलकर आणि इतर कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
