Kankavli Local Body Election 2025 Results : संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या कणकवली नगरपंचायत निवडणुकीचा निकाल अखेर जाहीर झाला असून, येथे कमालीची चुरस पाहायला मिळाली. नगराध्यक्षपदाच्या अत्यंत चुरशीच्या लढतीत शहर विकास आघाडीचे उमेदवार संदेश पारकर यांनी भाजपचे उमेदवार समीर नलावडे यांचा १४५ मतांनी पराभव करत विजय मिळवला आहे.

मात्र, नगरसेवकपदाच्या १७ जागांपैकी भाजपला ९ जागा मिळाल्याने सभागृहात भाजपचे बहुमत राहणार आहे, तर शहर विकास आघाडीला ८ जागांवर समाधान मानावे लागले.

राणे बंधू आमनेसामने

या निवडणुकीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे भाजपचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या विरोधात त्यांचेच बंधू आणि शिंदे शिवसेनेचे आमदार निलेश राणे मैदानात उतरले होते. निलेश राणे यांनी शहर विकास आघाडीच्या प्रचारात मुसंडी मारत मतदारांना दिलेला धीर आघाडीसाठी निर्णायक ठरला. शिंदे शिवसेना, ठाकरे शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी (शरद पवार गट) आणि मनसे अशा सर्वपक्षीय शहर विकास आघाडीने भाजपसमोर मोठे आव्हान उभे केले होते.

नगराध्यक्षपद संदेश पारकर शहर विकास आघाडी ५२४१ (विजयी) ,समीर नलावडे भाजप ५०९६,गणेशप्रसाद पारकर लोकराज्य जनता पार्टी १७५,नोटा (NOTA) ७२ मते पडली.

धक्कादायक निकाल आणि दिग्गजांचा पराभव

या निवडणुकीत अनेक अनपेक्षित निकाल लागले. भाजपचे माजी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांचा शहर विकास आघाडीच्या जयेश धुमाळे यांनी पराभव केला. तसेच, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांनाही पराभवाचा धक्का सहन करावा लागला. दुसरीकडे, युवा सेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी आपले राजकीय वर्चस्व सिद्ध करत विजय मिळवला.

प्रभागनिहाय महत्त्वाचे विजय

भाजपचे विजयी उमेदवार: राकेश राणे (प्रभाग १), प्रतीक्षा सावंत (प्रभाग २), स्वप्नील राणे (प्रभाग ३), मेघा गांगण (प्रभाग ५), सुप्रिया नलावडे (प्रभाग ७ – सर्वाधिक मताधिक्य), मेघा सावंत (प्रभाग ९), आर्या राणे (प्रभाग १०), मनस्वी ठाणेकर (प्रभाग १२), संजय कामतेकर (प्रभाग १६).

तर शहर विकास आघाडीचे विजयी उमेदवार: जाई मुरकर (प्रभाग ४), सुमेधा अंधारी (प्रभाग ६), लुकेश कांबळे (प्रभाग ८), दीपिका जाधव (प्रभाग ११), जयेश धुमाळे (प्रभाग १३), रुपेश नार्वेकर (प्रभाग १४), संकेत नाईक (प्रभाग १५), सुशांत नाईक (प्रभाग १७) विजयी ठरले.

‘भयमुक्त’ नारा ठरला यशस्वी

भाजपने ‘विकास’ हा प्रचाराचा मुख्य मुद्दा बनवला होता, मात्र शहर विकास आघाडीने दिलेला ‘भय व भ्रष्टाचार मुक्त कणकवली’चा नारा मतदारांना अधिक भावल्याचे निकालावरून स्पष्ट होत आहे. २ डिसेंबर रोजी झालेल्या ७९.७१ टक्के मतदानाचा कल संदेश पारकर यांच्या बाजूने झुकला.

निवडणूक निर्णय अधिकारी दीक्षांत देशपांडे आणि त्यांच्या पथकाने मतमोजणीची प्रक्रिया पार पाडली. या निकालामुळे जिल्ह्याच्या राजकारणात आता नवीन समीकरणे पाहायला मिळण्याची शक्यता आहे.