kapil sibal on bmc election results 2026 bjp strategy : मुंबई महापालिका निवडणूक पार पडली असून निकालानंतर भाजपा- शिवसेना (शिंदे) महायुतीचे सरकार मुंबई महापालिकेत बसणार असल्याचे निश्चित झाले आहे. मुंबईत भारतीय जनता पक्ष हा पहिल्या क्रमांकावर राहिला आहे. ठाकरेंची ३० वर्षांची सत्ता उलथवून टाकत भाजपाने मुंबई महापालिका काबीज केली आहे. या निवडणूक निकालानंतर ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
मुंबई महापालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्ष २२७ पैकी ८९ जागा जिंकून पहिल्या क्रमांकाचा पक्ष बनला आहे. तर शिवसेना (शिंदे) पक्षाला अवघ्या २९ जागांवर समाधान मानावे लागले आहे. काँग्रेसला या निवडणुकीत २४, मनसे ६, शिवसेना (ठाकरे) ६५, राष्ट्रवादी (शरद पवार) १, राष्ट्रवादी (अजित पवार) ३ जागा मिळाल्या आहेत.
एकंदरीत या निकालाबद्दल बोलताना सिब्बल म्हणाले की, “मुंबई महानगरपालिकेची निवडणूक झाली त्याचे निकाल आपल्यासमोर आले आहेत. ही निवडणूक महाराष्ट्र आणि राष्ट्रीय स्तरावरील निवडणुकीबाबत काही संकेत देतात. सर्वात महत्त्वाचे म्हणजे मुंबई महापालिकेचे वार्षिक बजेट हे सुमारे ७४ हजार कोटींचे आहे, म्हणजे सिक्कीम, गोवा आणि त्रिपुरा या तिन्ही राज्यांच्या एकत्रित बजेटपेक्षाही मोठे यांचे बजेट आहे. त्यामुळे याचे एक वेगळे महत्व आहे.”
मुंबई महापालिका निवडणुकीच्या इतिहासाबद्दल बोलताना सिब्बल यांनी शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि मनसे या पक्षांच्या जागा कमी होत गेल्याचा मुद्दा अधोरेखित केला. सिब्बल म्हणाले की, “मागील निवडणुकीत शिवसेना एकत्र लढली होती, म्हणजेच शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गट एकत्र होते, तेव्हा त्यांनी बहुमत मिळवले होते आणि महापालिका यांच्या हातात होती. सध्या तर शिंदे गटाने महापालिका गमावली आहे. इतिहास पाहीला तर, २०१२ च्या महापालिका निवडणुकीत भाजपाला फक्त ३१ जागा मिळाल्या होत्या. २०१७ मध्ये ८२ जागा मिळाल्या आणि २०२६ मध्ये ८९ मिळाल्या आहेत. शिवसेनेला आधी ७५ जागा मिळाल्या होत्या, नंतर ८४ मिळाल्या. काँग्रेसला २०१२ मध्ये ५२ जागा मिळाल्या होत्या, नंतर २०१७ मध्ये ३१ जागा मिळाल्या आणि आता २४ मिळाल्या. म्हणजे काँग्रेस पक्षाचा ग्राफ खाली येत आहे. शिवसेनेत फूट पडली त्यामुळे त्यांचा ग्राफही खाली आला. एनसीपीला २०१२ मध्ये १३ जागा, पुन्हा २०१७ मध्ये ९ आणि त्यानंतर ३ जागा आल्या. मनसेच्या जागा २८ त्यानंतर ७ आणि आता ६ जागा आल्या.”
पुढे बोलताना सिब्बल म्हणाले की, “म्हणजेच मनसेचा ग्राफ खाली येत गेला, एनसीपीतर जवळपास संपूनच गेली, काँग्रेसचा ग्राफ खाली येत आहे आणि शिवसेनेच्या शिंदे गटाला फक्त २९ जागा मिळाल्या आहेत आणि भाजपाला ८९ जागा मिळाल्या आहेत. मग नुकसान कोणाचे झाले? सगळ्यांचे नुकसान झाले, आणि फायदा भाजपाला झाला. भाजपाची ही निवडणूक स्ट्रॅटेजी राहिली आहे, पहिले पास (जवळ) उसके बाद बनवास.”
