कराड : कराड शहरासह परिसराला आज मंगळवारी दुपारी एक आणि सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास वारे अन् विजांच्या गडगडासह वळवाच्या पावसाने झोडपले. हा पाऊस शेजारील प्रदेशातही सुरू असल्याचे वृत्त आहे. काल रात्री आठ वाजल्यापासून रात्री उशिरापर्यंत कराड परिसराची पावसाने दैना उडवून दिली.
उष्म्याचा कहर झाल्याने हैराण जीवांना या पावसाने दिलासा मिळाला आहे. ढगाळ वातारणात तुफान पाऊस होत असल्याने सर्वांना पावसाळ्याची अनुभूती मिळत आहे. गेल्या दोन-चार दिवसांत जिल्ह्यात ठिकठिकाणी हा पाऊस जोरदार बरसला असून, अजूनही तो कोसळणे सुरूच आहे. सातारा, कोयनानगर, मायणी, पुसेगाव, महाबळेश्वर, आदर्की, फलटण, वरकुटे- मलवडी, दहिवडी, आनेवाडी, खटाव, कास, चाफळ, मलकापूर अशा सातारा जिल्ह्यातील अनेक ठिकाणी हा पाऊस कोसळला आहे. त्यामुळे हवेत गारवा निर्माण झाल्याने उष्म्याने प्रचंड त्रासलेले लोक सुखावले आहेत. खरीपपूर्व मशागतीसाठी हा पाऊस पोषक असल्याने शेतकरी वर्गातूनही समाधान व्यक्त होत आहे.
सध्याच्या पावसाने सर्वत्र पाणीच पाणी होताना रस्ते जलमय झाले आहेत. पावसाळ्यापूर्वीची संपूर्ण नालेसफाई पूर्ण झाली नसल्याने पाणी तुंबून वाहतुकीला मोठा अडथळा होत असल्याचे दिसत आहे. पुणे- बंगळुरू महामार्गाच्या सहापदारीकरणाचे रखडलेले काम, नाल्यांची अपूर्ण कामे यामुळे अनेक ठिकाणी रस्ते पाण्यात गेल्याने कुठे वाहतूक ठप्प तर, कुठे ती संथ गतीने सुरू आहे. त्यामुळे वाहनधारक, प्रवासी व स्थानिक लोकांचे प्रचंड हाल सुरू आहेत. अशीच परिस्थिती अन्य रस्त्यांवरही दिसून येत आहे.