कराड : दबक्या पावलांनी शिकार करणाऱ्या बिबट्यालाच साळिंदराची शिकार जीवावर बेतल्याची खळबळजनक घटना तळबीड (ता. कराड) परिसरात उघडकीस आली आहे. साळिंदराच्या अंगावरील अतीव टोकदार आणि प्राणघातक काटे बिबट्याच्या शरीरात खोलवर घुसल्याने गंभीर दुखापत होऊन त्याचा मृत्यू झाला असल्याची प्राथमिक शक्यता वन विभागाने व्यक्त केली आहे.या घटनेमुळे तळबीड परिसरात बिबट्या पाठोपाठ आता साळिंदर प्राण्याचेही भय तीव्रतेने दाटले आहे.
तळबीड परिसरातील शेतात बिबट्या मृतावस्थेत पडल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरताच स्थानिकांमध्ये घबराट पसरली. ही माहिती मिळताच वनाधिकारी ललिता पाटील यांच्या पथकाने तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. बिबट्याची शिकार किंवा मानवी हस्तक्षेप झाला आहे का, याचा शोध घेतला असता बिबट्याचे सर्व अवयव सुस्थितीत आणि सुरक्षित असल्याचे निदर्शनास आले.
प्राथमिक अंदाजानुसार, बिबट्याने साळिंदराची शिकार करण्याचा प्रयत्न केला असावा. स्वतःचा बचाव करण्यासाठी साळिंदराने अंगावरील काटे उभे करून प्रतिकार केला. या धुमश्चक्रीत साळिंदराचे काटे बिबट्याच्या तोंडात, मानगुटीवर आणि शरीरात खोलवर रुतले. साळिंदराच्या काट्यांमधील विषारी संसर्ग आणि तीव्र वेदनांमुळे बिबट्याला हालचाल करणे असह्य झाले असावे. अन्नपाण्याविना तडफडून त्याचा सुमारे दोन दिवसांपूर्वी मृत्यू झाला असावा असा संशय आहे.
या घटनेने परिसरातील शेतकरी चक्रावून गेले आहेत. बिबट्यासारख्या आक्रमक शिकारी प्राण्याला थारा न देणारा साळिंदर किती धोकादायक ठरू शकतो, याची जाणीव झाल्याने ग्रामस्थांमध्ये नव्या भीतीचे वातावरण आहे. वन विभागाचे पथक परिसरात इतर वन्यप्राण्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवून असून पुढील तपास करत आहे.
तळबीड परिसरातील नागरिक आजवर केवळ बिबट्याच्या वावरामुळे भयभीत होते. मात्र, एका साळिंदराने स्वतःच्या संरक्षणासाठी बिबट्यासारख्या हिंस्र प्राण्याचा थेट बळी घेतल्याची घटना उघडकीस आल्याने आता साळिंदराची नवी दहशत निर्माण झाली आहे. अत्यंत तीक्ष्ण आणि विषारी संसर्गास कारणीभूत ठरू शकणारे काटे अंगावर बाळगणारा साळिंदर प्राणी शेतात किंवा रात्रीच्या वेळी समोरासमोर आल्यास मानवालाही गंभीर इजा पोहोचवू शकतो. त्यामुळे बिबट्याच्या दहशती पाठोपाठ आता साळिंदराच्या अनपेक्षित हल्ल्याचे भय ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांमध्ये दाटले आहे.
सतर्कतेचे आवाहन
या घटनेच्या पार्श्वभूमीवर वन विभागाने तळबीड व लगतच्या भागातील नागरिकांना विशेष दक्षता घेण्याचे आवाहन केले आहे. रात्रीच्या वेळी शेतामध्ये एकट्याने जाणे पूर्णपणे टाळावे. परिसरात कोणताही वन्यप्राणी दिसल्यास त्याच्या जवळ जाण्याचा, त्याला हुसकावण्याचा अथवा गर्दी करून चिथावणी देण्याचा प्रयत्न करू नये. वन्यप्राणी स्वतःच्या बचावासाठी अधिक आक्रमक होऊ शकतात. गावात किंवा शेतात संशयास्पद हालचाली दिसल्यास अथवा वन्यप्राणी आढळल्यास तातडीने वन विभागाशी संपर्क साधावा असे आवाहन वनअधिकाऱ्यांनी केले आहे.
मृत्यूचे नेमके कारण महत्त्वाचे
वनाधिकारी ललिता पाटील यांच्या नेतृत्वाखालील पथकाने घटनास्थळाची पाहणी केली असता बिबट्याचे सर्व अवयव सुरक्षित असल्याचे आढळून आले. शिकारीच्या प्रयत्नात साळिंदराचे काटे शरीरात खोलवर घुसून झालेल्या गंभीर जखमांमुळे अथवा त्यामुळे उद्भवलेल्या शारीरिक गुंतागुंतीतून हा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. बिबट्याचा मृत्यू सुमारे दोन दिवसांपूर्वी झाला असावा. वन्यजीव तज्ज्ञांच्या मते साळिंदराचे काटे शरीरात रुतल्यास होणारा तीव्र दाह आणि संसर्ग प्राण्यासाठी प्राणघातक ठरतो. नेमका घटनाक्रम आणि कारण शवविच्छेदन अहवालानंतरच स्पष्ट होईल.
