कराड : कराड नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी भाजपने घेतलेल्या इच्छुकांच्या मुलाखतीत माजी नगराध्यक्ष शारदा जाधव व जयवंत पाटील यांच्यासह मातब्बर १५ जणांचा समावेश आहे. गतखेपेला भाजपचा नगराध्यक्षपदाचा उमेदवार निर्णायक मतांनी निवडून आला होता. तर, वर्षभरापूर्वीच्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे डॉ. अतुल भोसले मोठ्या मताधिक्याने जिंकल्याने सध्या भाजपची चलती असून, उमेदवारांच्या निवडी करणे व्यक्तिगत आमदार डॉ. भोसलेंसाठी मोठे आव्हान ठरणार आहे.
‘कराड उत्तर’मधून २००४ सालच्या विधानसभा निवडणुकीत अपक्ष म्हणून थोडक्या मतांनी विजश्री हुकलेले अरुण जाधव, ज्येष्ठ नगरसेवक विनायक पावसकर, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व भाजपचे स्थानिक ज्येष्ठ नेते घन:श्याम पेंढारकर हेही भाजपकडून नगराध्यक्षपदासाठी इच्छुक आहेत.
कराड नगरपालिकेचे नगराध्यक्षपद तब्बल तीन दशकांनंतर खुल्या प्रवर्गाला मिळाल्याने मिनी आमदारकी म्हणून संधी असलेल्या या प्रतिष्ठेच्या खुर्चीसाठी कसदार पहिलवान आखाड्यात उतरलेत. नगराध्यक्ष आणि ३० नगरसेवकांसाठीची निवडणूक महायुती विरुध्द महाविकास आघाडी या एकजुटीने लढतील का? असा प्रमुख प्रश्न असतानाच दोन्हीकडील स्थानिक नेते व कार्यकर्त्यांची महत्त्वाकांक्षा पाहता सध्या तरी, भक्कम महायुती अन् मजबूत महाविकास आघाडी असे चित्र नाही. त्यामुळे अनेक ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती होतील असे आजमितीला तरी म्हणावे लागत आहे. काँग्रेसनेही ताकदीने निवडणूक लढवण्याचे रणशिंग फुंकले आहे. मात्र, त्यांची रणनीती स्पष्ट होत नसून, त्यांना मर्यादित प्रतिसाद मिळत असल्याचे दिसते आहे.
शिवसेनेकडून (एकनाथ शिंदे गट) माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र यादव यांची नगराध्यक्षपदाची उमेदवारीच संपर्क नेत्यांनी आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात जाहीर केली आहे. तर, दुसरीकडे याच शिवसेनेचे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय रणजित पाटील हे बंडखोरी करतात किंवा काय हे सुध्दा तितकेचे महत्त्वाचे मानले जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून (शरद पवार गट) माजी सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांचे पुतणे सौरभ पाटील किंवा बंधू सुभाष पाटील यापैकी एकाचे नाव अंतिम होईल असे मानले जात आहे. एकूणच या निवडणुकीत भाजपचा बोलबाला असून, भाजपचे अधिकृत उमेदवार व राजेंद्र यादव तसेच बाळासाहेब पाटील देतील तो (शरद पवार गट) उमेदवार यांच्यातच तिरंगी लढत रंगेल असे सध्याचे चित्र आहे.
