माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र यादव यांची माहिती

नगरपालिकांच्या शाळांमध्ये राज्यात सर्वाधिक अकराशेहून अधिक विद्यार्थ्यांच्या पटसंख्येचा नवा विक्रम कराड पालिकेच्या शाळा क्रमांक ३ ने नोंदवला आहे. या शाळेने नगरपरिषदेच्या विभागात राज्यात पहिली आयएसओ मानांकन प्राप्त शाळा होण्याचा मान यापूर्वीच मिळवला असून, अनेक विक्रम नोंदवताना देशातील वैशिष्टय़पूर्ण शाळा म्हणून बहुमान मिळवण्याचा संकल्प असल्याची माहिती माजी उपनराध्यक्ष राजेंद्र यादव यांनी पत्रकार बैठकीत दिली. मुख्याध्यापक अर्जुन कोळी व शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी या वेळी उपस्थित होते.

यादव म्हणाले, की खासगी संस्थांच्या व इंग्रजी माध्यमांच्या शाळांना पालक व विद्यार्थ्यांची पसंती राहताना नगरपालिका, जिल्हा परिषदांच्या शाळा ओस पडू लागल्या आहेत. पटसंख्येअभावी शिक्षक कमी करण्याची नामुष्कीही शासनावर ओढावली गेली असताना, कराड पालिकेच्या केंद्रशाळा क्र. ३ ने गेल्या ६ वर्षांंत उत्तुंग कामगिरी बजावताना आपला नावलौकिक सर्वदूर नेला आहे. आपण बारकाईने लक्ष घालून शिक्षक, पालक व परिसरातील नागरिकांना समजावून घेत मुख्याध्यापक अर्जुन कोळी यांच्या माध्यमातून शाळेचे रूपडे पालटले आहे. रोल मॉडेल ठरावी अशीही शाळा असून, केंद्र शासनानेही शाळेच्या गुणवत्ता, प्रगती, रचनावादी व संस्कारक्षम कार्याची दखल घेऊन राज्य शासनामार्फत विशेष प्रस्ताव मागवला आहे. तरी, केंद्र शासनाकडून या प्रस्तावाच्या अनुषंगाने निधीबरोबरच मिळणारे सहकार्य आमच्या दृष्टिपथात आहे. सध्या शाळोने १हजार१०० पेक्षा जादा पटसंख्या पूर्ण केली असून, आजही २०० विद्यार्थ्यांची नावे प्रतीक्षा यादीत आहेत. त्यामुळे सध्याच्या २१ वर्ग खोल्यांमध्ये वाढ करणार आहे. पटसंख्येच्या आधारे २७ शिक्षक प्राप्त होणे आवश्यक असताना, सध्या ९ शिक्षकच येथे देण्यात आले आहेत.  तरी निकषानुसार २७ शिक्षक रूजू करण्यासाठी पाठपुरावा करणार आहे. गतवर्षी विविध स्पर्धा परीक्षेत ४० विद्यार्थी राज्यस्तरापर्यंत चमकले आहेत.  गेल्या ४ वर्षांत गुणवत्ता यादीत ११७ विद्यार्थ्यांनी स्थान मिळवले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.