कराड :समाधानकारक पावसामुळे यंदाच्या खरीप हंगामातील पिकांची वाढ उत्तम झाली असली, तरी आता किडींच्या प्रादुर्भावाने बळीराजा संकटात सापडला आहे. विशेषतः कराड व पाटण तालुक्यात भुईमूग पिकामध्ये हुमणी किडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर आढळून येत असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. हातातोंडाशी आलेला घास हिरावला जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
यंदाच्या पावसाने भुईमूग, सोयाबीन आणि मका पिकांना पोषक वातावरण मिळाले. सध्या भांगलणी व कोळपणीची कामे अंतिम टप्प्यात असतानाच किडींचा प्रादुर्भाव वाढल्याने चिंता व्यक्त होत आहे. मुख्यतः उसावर पडणारी हुमणी आता भुईमुगाच्या मुळांवर हल्ला करत असून, त्यामुळे पिके वाळू लागली आहेत.
हुमणीचा भुईमुगावर हल्ला
एरवी ऊस पिकासाठी अत्यंत धोकादायक मानली जाणारी हुमणी किड आता भुईमुगाच्या शेतात पसरली आहे. हुमणीच्या अळ्या जमिनीखाली राहून पिकांची मुळे कुरतडतात. मुळे नष्ट झाल्याने रोपे वाळून जातात. प्रादुर्भाव वेगाने वाढत असल्याने संपूर्ण पीक जळून खाक होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
फवारणी, औषधांच्या खर्चाचा भार
हुमणी किडींचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शेतकऱ्यांना महागड्या कीटकनाशकांची वारंवार फवारणी करावी लागत आहे. एकापेक्षा अधिक वेळा फवारणी करावी लागत असल्याने औषधे, मजुरी आणि यंत्रांचा खर्च मोठ्या प्रमाणात वाढला आहे. आधीच बियाणे, खते आणि मशागतीमुळे आर्थिक संकटात असणाऱ्या बळीराजावर या अतिरिक्त खर्चाचा प्रचंड ताण आला आहे.
कृषी विभागाकडून मार्गदर्शनाची मागणी
पिकांची उत्तम वाढ पाहता यंदा चांगल्या उत्पन्नाची आशा होती; मात्र ‘हुमणी’ने गदा आणली आहे. किडींचे नियंत्रण वेळेत झाले नाही तर भुईमुगाच्या उत्पादनात घट होण्याची मोठी धास्ती आहे. त्यामुळे कृषी विभागाने तत्काळ शेतांची पाहणी करून शेतकऱ्यांना कीटकनाशकांचा योग्य वापर आणि जैविक उपायांचे प्रभावी मार्गदर्शन करावे, अशी मागणी जोर धरत आहे.
