कराड : नैसर्गिक अधिवासातील अन्नसाखळी कमकुवत झाल्यामुळे भक्ष्यांच्या शोधात मानवी वस्ती अन् औद्योगिक परिसराकडे वळणाऱ्या वन्यजीवांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा गंभीर बनला आहे. कराड तालुक्यातील तासवडे एमआयडीसी परिसरातील ‘महावितरण’च्या वीज उपकेंद्रातील डीपीवर विजेच्या तारांत अडकून एका बिबट्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. आज पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. बिबट्यांचे वेगवेगळ्या प्रकारे नागरी वस्त्यात मृत्यू होत असून, ही बाब निश्चितपणे चिंताजनक बनली आहे.
अन्न आणि पाण्याच्या शोधात भरकटलेला हा बिबट्या उच्चदाब वीज वाहिनीच्या संपर्कात आल्याने त्याचा जागीच अंत झाला. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत असून, वन्यजीवांचे नागरी वस्तीतील वाढते आक्रमण आणि बिघडत चाललेला पर्यावरणीय समतोल यावर गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली आहे.
पहाटेच्या सुमारास उपकेंद्रात मोठा आवाज झाल्यानंतर रात्रपाळीच्या कर्मचाऱ्यांनी पाहणी केली असता बिबट्या डीपीवर अडकल्याचे निदर्शनास आले. घटनेची माहिती मिळताच वनविभागाने तातडीने धाव घेत वीजपुरवठा खंडित केला आणि सकाळी पाचच्या सुमारास बिबट्याचा मृतदेह खाली उतरवला. वराडे येथील वनविभागाच्या जागेत त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
भक्ष्यांची संख्या घटल्याची समस्या
अन्नसाखळीचा ऱ्हास आणि वन्यजीवांचे भरकटणे हे दिवसेंदिवस गंभीर बनत चालले आहे. जंगलातील नैसर्गिक भक्ष्यांची संख्या घटल्याने आणि अन्नसाखळीची साखळी कमकुवत झाल्याने बिबट्यासारखे हिंस्त्र प्राणी भक्ष्याच्या सोप्या शोधात शहरांकडे व औद्योगिक वसाहतींकडे आकर्षित होत आहेत. मानवी हस्तक्षेपामुळे अधिवास आकुंचन पावल्याने उपाशी वन्यजीव असे नागरी क्षेत्रात गुरफटत आहेत आणि अपघाती मृत्यूला सामोरे जात आहेत.
सततचा वावर
‘एमआयडीसी’त सातत्यपूर्ण वावर आणि भीतीचे सावट तासवडे एमआयडीसी आणि लगतच्या परिसरात यापूर्वीही अनेकदा बिबट्याचा वावर नोंदवला गेला आहे. विविध कंपन्यांच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये बिबट्याचे दर्शन वारंवार घडले आहे. त्यामुळे औद्योगिक वसाहतीतील कामगार आणि स्थानिक रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण असून सुरक्षेच्या दृष्टीने ठोस उपाययोजनांची मागणी होत आहे.
आव्हानांचा डोंगर
वनविभाग आणि महावितरणसमोर आव्हानांचा डोंगर उभा आहे. अशा दुर्घटना रोखण्यासाठी केवळ वन्यजीवांना हटवणे पुरेसे नसून, उघड्या वीज यंत्रणा सुरक्षित करणे आणि प्राण्यांना मानवी वस्तीत येण्यापासून रोखण्यासाठी अभ्यासपूर्ण प्रतिबंधात्मक उपाययोजना आखणे गरजेचे आहे. वनविभागाने या समस्येच्या मुळाशी जाऊन अन्नसाखळीच्या पुनरुज्जीवनासाठी आणि सुरक्षेसाठी तातडीने पावले उचलणे आवश्यक बनले आहे.
