कराड : दुर्घटना व जीवितहानी टाळण्यासाठी कराड-चिपळूण मार्गावरून शुक्रवारपर्यंत (दि. २७) सर्व प्रकारच्या अवजड वाहनांची वाहतूक बंद राहणार असून, वाहतूक मार्गातील बदलांची नोंद घेऊन सर्वांनी पोलीस दलास सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी केले आहे.

गुहागर- विजापूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १६६ च्या रुंदीकरणाचे काम सुरू असताना पाटण तालुक्यात वाजेगाव व शिरळ या ठिकाणी अतिवृष्टीने १६ जून रोजी पर्यायी मार्ग वाहून गेला. त्यामुळे मुख्य रस्त्यावर तात्पुरती दुरुस्ती करून हा रस्ता हलक्या वाहनांना खुला करण्यात आला. मात्र, पावसाचे वाढलेले प्रमाण व साचत असेलल्या पाण्याचा योग्य प्रकारे निचरा होत नसल्याने येथून जड वाहने सोडण्यात आली नाहीत.

या रस्त्याचे काम पूर्ण होण्यासाठी २७ जूनपर्यंत कालावधी लागणार असल्याने हा रस्ता २७ जून रात्री १२ वाजेपर्यंत बंद राहणार आहे. यामुळे वाहतुकीत ज्या ठिकाणावरून वळविण्यात आली आहे. अशा सर्व ठिकाणी दिशादर्शक फलक व त्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त नेमण्यात आला आहे. वाहतूक मार्गातील बदलांची नागरिकांनी व वाहनचालकांनी नोंद घ्यावी.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वाहतूक मार्गातील बदल

कराड व उंब्रज बाजूकडून चिपळूणकडे जाणारी अवजड वाहतूक कराड व उंब्रजमधून सरळ पुणे- बंगळुरू महामार्गावरून पाचवड फाटा उंडाळे, कोकरुड- मलकापूर आंबाघाट संगमेश्वरवरून चिपळूणकडे जाईल. चिपळूणकडून कराड व उंब्रजकडे येणारी अवजड वाहतूक चिपळूणवरून संगमेश्वर- आंबा घाट- मलकापूर, कोकरुड, उंडाळे, पाचवड फाटा, पुणे- बंगळुरू महामार्गावरून कराड, उंब्रजकडे जाणार आहे.