कराड : उंडाळे (ता. कराड) येथील ओढ्यातील पाणी विहिरीत सोडण्यासाठी काढलेल्या चरीमध्ये काम करत असताना ढिगारा कोसळून दोन तरुण मजुरांचा गुदमरून जागीच दुर्देवी मृत्यू झाला. पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, करण बाजीराव चव्हाण (३०) आणि अमर रंगराव वडार (३०, दोघेही रा. मनव, ता. कराड) अशी या दुर्घटनेत मृत्यू पावलेल्या दोघांची नावे आहेत.
उंडाळे- मनव रस्त्यालगत ठाकराची मळी नावाच्या शिवारात उंडाळे येथील शेतकरी श्रीरंग हरी पाटील यांच्या शेताजवळील ओढ्यातील पाणी विहिरीत वळविण्यासाठी जेसीबीच्या साहाय्याने १० ते १२ फूट खोल चर काढण्याचे काम सुरू होते. चर तयार झाल्यानंतर त्यामध्ये सिमेंटची वाहिनी टाकून पाणी वाहून नेण्यासाठी जलवाहिनी बसविण्याचे नियोजन करण्यात आले होते.
या कामासाठी मनव येथील करण चव्हाण आणि अमर वडार यांना सिमेंटची वाहिनी जोडण्याची जबाबदारी देण्यात आली. दुपारच्या सुमारास जेसीबी चालक आणि इतर कामगार जेवणासाठी झाडाखाली थांबले होते. त्यांनी दोघांनाही जेवण झाल्यानंतर काम सुरू करूया, असे सांगितले.मात्र, दुसऱ्या ठिकाणी काम असल्याने लवकर निघण्याच्या घाईत दोघांनी कोणालाही न सांगता चरीमध्ये उतरून जलवाहिनी जोडण्याचे काम सुरू केले. त्याचवेळी वरच्या बाजूचा निसटलेला ढिगारा अचानक कोसळून दोघांच्या अंगावर पडला. त्यामुळे त्यांना बाहेर पडण्याची संधी मिळाली नाही, आणि यात त्या दोघांचाही श्वास गुदमरून जागीच मृत्यू झाला.
दरम्यान, जेसीबी चालकाच्या लक्षात ही बाब येताच त्यांने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. चरीमध्ये मोठ्या प्रमाणावर पडलेल्या मलम्यात अडकलेल्या दोघांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, बराच वेळ निघून गेल्याने, अंगावर हा ढिगारा कोसळून हे दोघेही त्याखाली गुदमरल्याने मृतावस्थेत आढळले. यानंतर त्यांना उंडाळे येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून, दोघांनाही मृत घोषित केले.या घटनेची नोंद कराड ग्रामीण पोलीस ठाण्यात झाली आहे.या दुर्दैवी घटनेमुळे मनव परिसरात शोककळा पसरली आहे.
