कराड : कृष्णा- कोयना नद्यांच्या अपूर्व प्रीतिसंगमावरील आणि दक्षिण काशी म्हणून ओळख असलेल्या कराडनगरीत वीरशैव लिंगायत समाजाचा सामुदायिक इष्टलिंग पूजा व आशीर्वचन सोहळा भक्तीमय वातावरणात उत्साहात संपन्न झाला. संस्कार आणि शिवभक्तीचा अपूर्व संगम घडवणाऱ्या या सोहळ्याला केदारपीठाचे जगद्गुरु भीमाशंकरलिंग शिवाचार्य महास्वामींसह चार प्रमुख शिवाचार्यांची उपस्थिती लाभली.
कराडच्या पवित्र भूमीला धार्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक समृद्धतेची प्रदीर्घ परंपरा आहे. याच परंपरेचे सोनेरी पान या सोहळ्याच्या निमित्ताने जोडले गेले. अधिक मासाची सांगता आणि सोमवती अमावस्या असा दुर्मिळ सुवर्णयोग जुळून आल्यामुळे कृष्णा- कोयनेच्या प्रीतिसंगमावर शिवभक्तांचा उत्साह ओसंडून वाहत होता. नव्या पिढीला सनातन तत्त्वज्ञान, उच्च संस्कार आणि आचार- विचारांची ओळख करून देणारा हा सोहळा सामाजिक ऐकोप्याचे उत्तम उदाहरण ठरले.
केदारपीठाचे जगद्गुरु महास्वामी म्हणाले, “रुद्राक्ष धारण करणे आणि श्रद्धेने इष्टलिंगाची पूजा करणे ही शिवतत्त्वाशी जोडली जाणारी आत्मिक प्रक्रिया आहे. इष्टलिंग हा केवळ बाह्य दागिना नसून, तो जिवाचा शिवाशी थेट संवाद साधणारा जिवंत दुवा आहे.” मानवी शरीर हेच एक ब्रह्मांड असल्याची जाणीव शरीरावर लावलेले भस्म करून देते, असे सांगत, त्यांनी भस्माच्या आध्यात्मिक पैलूवर प्रकाश टाकला.
शरीरावर लावलेले भस्म हे मानवी शरीरच एक ब्रह्मांड असल्याची जाणीव करून देणारे श्रेष्ठ तत्त्वज्ञान आहे. हा सोहळा नव्या पिढीला सनातन तत्त्वज्ञान, उच्च संस्कार आणि आचार-विचारांची ओळख करून देणारा ठरला असल्याचे भीमाशंकरलिंग शिवाचार्य म्हणाले.
भस्माला आध्यात्मिक महत्त्व
डॉ. शिवयोगी शिवाचार्य म्हैसाळकर यांनी आत्मशुद्धी आणि सामाजिक समतेचा संदेश दिला. ते म्हणाले, ‘‘माणूस आयुष्यात संपत्ती आणि कीर्ती मिळवू शकतो; मात्र अंतिम प्रवासात केवळ त्याचे संस्कार आणि शिवभक्तीच सोबत राहते. वीरशैव लिंगायत धर्मातील इष्टलिंग पूजा ही वैयक्तिक विधी नसून, समाजमनात समता, श्रमप्रतिष्ठा आणि आत्मीयतेची भावना रुजवणारी सामाजिक चळवळ आहे’’.
माणूस आयुष्यात संपत्ती आणि कीर्ती मिळवू शकतो; मात्र अंतिम प्रवासात केवळ त्याचे संस्कार आणि शिवभक्तीच सोबत राहते. वीरशैव लिंगायत धर्मातील इष्टलिंग पूजा ही समाजमनात समता, श्रमप्रतिष्ठा आणि आत्मीयता रुजवणारी सामाजिक चळवळ असल्याचे शिवाचार्य म्हैसाळकर यांनी सांगितले. या सोहळ्याला शिवलिंग शिवाचार्य व महादेव शिवाचार्य वाईकर यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. प्रमोद सुकरे यांनी केले. राजू शेटे, शिवानंद डुबल, भरत शेटे, चंद्रशेखर नखाते आणि विजय पट्टणशेट्टी या पाच दांपत्यांच्या हस्ते मुख्य महापूजा संपन्न झाली. या सोहळ्याने उपस्थितांना भक्तीसोबतच सुसंस्कृत जीवन जगण्याची नवी दिशा दिली.
