कराड : मानाच्या पालखी सोहळ्याच्या यादीमध्ये नाव समाविष्ठ करा या मागणीसाठी श्री सद्गुरू जयराम स्वामी पालखी सोहळ्याच्या वतीने कराड तहसील कार्यालयासमोर भरपावसात वारकऱ्यांनी भजन गात बेमुदत आंदोलन छेडले. यावर आंदोलन थांबवण्यासाठी तहसीलदार व पोलिसांनी केलेली विनंती धुडकावली गेल्याने अखेर पोलिसांनी वारकऱ्यांना ताब्यात घेतले. या वेळी मुख्यमंत्र्यांशी बैठक घेण्याचे ठरल्याने वारकऱ्यांनी आंदोलन तूर्तास स्थगित केले.
दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बैठक घडवून देण्याची मागणी मान्य झाली नाही तर वाखरी रिंगण सोहळ्याच्या ठिकाणी आंदोलन करण्याचा इशारा वारकऱ्यांनी दिला आहे.
श्री सद्गुरू जयराम स्वामी महाराज पालखी सोहळा, श्री मच्छिंद्रनाथ पालखी सोहळा, श्री गाडगेनाथ महाराज पालखी सोहळा, श्री शेकोबादादा पालखी सोहळा व सध्यस्थितीत नवीन श्री ब्रह्म चैतन्य गोंदवलेकर महाराज पालखी सोहळा, श्री सेवागिरी महाराज पालखी सोहळा तसेच संत सखु पालखी सोहळा यांना मानाच्या पालखी सोहळ्यांच्या यादीमध्ये समाविष्ठ करा, या मागणीसाठी श्री सद्गुरू जयराम स्वामी पालखी सोहळ्याच्या वतीने शासन दरबारी पाठपुरावा सुरू आहे. मात्र, त्याची दखल न घेतल्याने वारकऱ्यांनी भरपावसात हे आंदोलन केले.
आषाढी वारीत मानाच्या दहा पालख्या शासनस्तरावर मान्यता प्राप्त आहेत. यापूर्वी त्या सात पालख्या होत्या. करोना काळात यात तीन पालख्या वाढवल्या गेल्या. परंतु सातारा, सांगली जिल्ह्यातील दोनशे वर्षांपूर्वीपासून चाललेले पालखी सोहळे पंढरपूरला येतात. हे शासन कबुल करते. मात्र, त्यांना मानाच्या पालख्यांच्या यादीत स्थान देत नाही. त्या दहा मानाच्या पालख्या म्हणून आमच्या पालख्यांचा अपमान केला जात असल्याचे श्री सद्गुरू जयराम स्वामी महाराज पालखी सोहळ्याचे प्रमुख विठ्ठलस्वामी महाराजांनी सांगितले.
विठ्ठलस्वामी महाराज यांच्यासह तुकाराम मटकरी, तानाजी यादव, मल्हारी जवारे महाराज, निरंजन महाराज, पोपट चव्हाण, कृष्णत महाराज कोळेकर, अंकुश जाधव, चंदू महाराज, नाना घाडगे, संतोष घाडगे, हनुमंत महाराज आळंदीकर आदी भजन आंदोलनात सहभागी होते.
दरम्यान, तहसीलदार कल्पना ढवळे यांनी आंदोलकांशी चर्चा केली. पावसामुळे इमारतीत बसून आंदोलन करण्यास सुचवले. कराड शहर पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनीही आंदोलन थांबविण्याची विनंती केली. मात्र, वारकऱ्यांनी भजन आंदोलन सुरूच ठेवले.
यावर पोलीस व वारकऱ्यांमध्ये काहीसा वादही झाला. पोलीस वारकऱ्यांना तर, वारकरी पोलिसांना हात जोडत होते. अखेर पोलीस वारकऱ्यांना ताब्यात घेवून पोलीस ठाण्यात घेऊन आले. या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बैठक घेण्याचे ठरल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले.