कर्जत:पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेचे पथक व कर्जत पोलीस यांच्या संयुक्त पथकाने चापडगाव (ता. कर्जत, अहिल्यानगर) येथे केलेल्या संयुक्त कारवाईत अफूची शेती उघडकीस आणण्यात आली. या कारवाईत २४८ किलो २४९ ग्रॅम वजनाची अफूची झाडे जप्त करण्यात आली. त्याची किंमत ४७ लाख ६४ हजार १८० रुपये असल्याचे स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक किरणकुमार कबाडी यांनी सांगितले. यासंदर्भात एका वृद्धास अटक करण्यात आली आहे.
गुन्हे शाखेच्या पोलिसांना चापडगाव येथे एक शेतकरी प्रतिबंधित आफू झाडाची लागवड करून त्याचे संवर्धन करत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांच्या पथकाने चापडगाव शिवारातील गट क्रमांक १३ मध्ये जाऊन खात्री केली. तेथे अफूच्या झाडांची लागवड केलेली आढळली. या अफूच्या झाडांना परमेश्वर बन्सी घनवट (वय ६८, चापडगाव, कर्जत) हा पाणी व खत घालून जोपासना करताना आढळून आला.
पोलिसांनी केलेल्या चौकशीत परमेश्वर घनवट याने ही अफूची झाडे दोन ते तीन महिन्यांपूर्वी लावल्याचे सांगितले. परमेश्वर घनवट याच्याविरुद्ध कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासंदर्भात गुन्हे शाखेचे पोलीस नाईक शामसुंदर जाधव यांनी फिर्याद दिली आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे , अतिरिक्त पोलीस अधीक्षक वैभव कलबुर्मे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रवीणचंद्र लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक विजय झंजाड, अनंत सालगुडे, समीर अभंग, दीपक घाटकर, विजय पवार, अतुल लोटके, संतोष खैरे, अमृत आढाव, उत्तरेश्वर मोराळे यांच्यासह कर्जत पोलिसांनी कारवाईमध्ये भाग घेतला.
जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ आढळू लागले आहेत. पोलिसांनी यापूर्वी संगमनेरमध्ये केलेल्या कारवाईत लाखो रुपयांचा गांजा जप्त केला. देशाच्या दक्षिण व उत्तर भागाला जोडणाऱ्या प्रमुख महामार्गांवर अहिल्यानगर जिल्हा असल्यामुळे अमली पदार्थांची मोठी वाहतूक होत असते. जिल्ह्यात बहुतांशपणे आंध्रप्रदेशातून व काही प्रमाणात ओडिशातून गांजा आणला जातो. असाच आंध्रप्रदेशमधून आणलेला गांजा पाथर्डी तालुक्यातील गोदामात साठवून ठेवल्याचे व त्याचे नंतर जिल्हाभर वितरण होणार असल्याचे यापूर्वी पोलिसांनी केलेल्या कारवाईत उघड झाले होते. पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी काही दिवसांपूर्वी पोलिस अधिकाऱ्यांच्या बैठकीत अमली पदार्थांच्या विरोधात कारवाई तीव्र करण्याच्या सूचना दिल्या होत्या.
