कर्जत : येथील बसस्थानकात खड्डे पडलेल्या आवाराचे सिमेंट काँक्रीटीकरणाचे काम शिवसेनेसह (शिंदे गट) विविध राजकीय पक्ष व हिंदुत्ववादी संघटनांच्या इशाऱ्यानंतर आज, सोमवारी सुरू करण्यात आले. निधी उपलब्ध असूनही हे काम रेंगाळले होते तसेच या कामात अडकाठी आणली गेली होती.
कर्जत बसस्थानकाच्या आवार पूर्णपणे उध्वस्त झाले आहे. मोठे खड्डे पडलेले आहेत, अनेक ठिकाणी जमिनीतून दगड वरती आलेले आहेत. एसटीच्या प्रवेशिनंतर मोठ्या प्रमाणामध्ये धूळ उडते, खड्ड्यामुळे व दगडांमुळे वृद्ध व्यक्ती पडून जखमी झाल्या आहेत, पावसाळ्यामध्ये विद्यार्थी, महिलांचे हाल होतात. यामुळे आवाराचे काँक्रिटीकरण करावे अशी प्रवाशांची, एसटीच्या चालक व वाहकांची मागणी होती.
त्यानुसार औद्योगिक वसाहत अंतर्गत असणाऱ्या सेस फंडामधून आमदार रोहित पवार यांच्या पुढाकारातून आवाराच्या सिमेंट काँक्रीटीकरणासाठी दोन वर्षांपूर्वी निधी उपलब्ध करण्यात आला. मात्र विविध अडथळे येत असल्यामुळे हे काम मार्गी लागत नव्हते.
ठेकेदाराने शुक्रवारी काँक्रिटीकरणाचे काम सुरू केले मात्र एका समाजातील काही युवकांनी तेथे येऊन बसस्थानकाच्या आवारातील जागा आमची आहे त्यामुळे तुम्ही कोणतेही काम करू नका असे म्हणून काम बंद पाडले होते. या पार्श्वभूमीवर शिवसेना, सकल हिंदू समाज व इतरही पक्षातील कार्यकर्त्यांनी आज बस स्थानकाच्या आवारातील सिमेंट काँक्रीटीकरणाचे काम सरकारी जागेमध्ये आहे, या कामात अडथळा निर्माण केल्यास चोप दिला जाईल, असा इशारा समाज माध्यमावर दिला होता.
आज सकाळी बसस्थानकावर शिवसेनेचे तालुकाप्रमुख डॉ. नितीन तोरडमल, हिंदुत्ववादी संघटनेचे प्रमुख ॲड. आकाश हळनावर, चंदनसिंग परदेशी, सनी पवार, भूषण शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे ऋषिकेश धांडे, सुधीर यादव, नवनाथ धांडे, सतीश समुद्र, भाजपचे बंटी यादव, सकल मराठा समाजाचे समन्वयक रावसाहेब धांडे, प्रसाद कानगुडे , ठेकेदार विराज अवताडे आदी उपस्थित झाले. पोलीस निरीक्षक सोपानराव शिरसाट पोलीस बंदोबस्तासह उपस्थित होते. काही काळ वातावरणामध्ये तणावही निर्माण झाला होता. मात्र सकाळी काम सुरळीत सुरू झाल्यामुळे व कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. उपस्थित सर्वांनीच यापुढील काळात अनाधिकाराने विकास कामांमध्ये जर कोणी अडथळा निर्माण करत असेल तर त्याची गय केली जाणार नाही असा इशारा दिला.
