कर्जत: तालुक्यातील चिंचोली रमजान येथे वृद्ध वडील बेपत्ता झाल्याची तक्रार मुलानेच पोलिसांत दिली; मात्र पोलीस तपासात धक्कादायक बाब उघडकीस आली. मुलानेच वडिलांचा खून करून मृतदेह जाळल्याचे निष्पन्न झाले. यामध्ये सहभागी असलेल्या एका आरोपीने अकोला जिल्ह्यात प्रेयसीचा खून केल्याचीही कबुली दिल्याने पोलिसांच्या तपासातून दोन वेगवेगळे खून उघडकीस आले. वृद्धाच्या खून प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मुलगा, सून व जावई अशा तिघांना अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आकाश बापू गाढवे (रा. चिंचोली रमजान, कर्जत) याने ५ मार्चला वडील बापू आनंदा गाढवे (वय ६०) बेपत्ता झाल्याची तक्रार मिरजगाव पोलीसांकडे दिली होती. जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी तपास स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्याकडे सोपवला.
तपासात पोलिसांना तक्रारदार आकाश गाढवेवर संशय बळावला. त्याच्याकडे व्यवस्थित चौकशी केली असता त्याने सुनिल रामदास राठोड (वय ३७, रा. नानासाहेब पातूर, अकोला, सध्या रा. चाकण, पुणे) व त्याच्या नातेवाईकांनी घातपात केल्याचा संशय व्यक्त केला. पोलिसांना सुनील राठोड हा त्याचा मित्र सचिन सारवान (रा. खळवाडी, शेगाव) याच्या घरात लपून बसल्याची माहिती मिळाली. पोलीस तेथे गेले.
पोलिसांना पाहताच तो पहिल्या मजल्यावरून उडी मारून पळण्याचा प्रयत्नात जखमी झाला. चौकशीत त्याने शेतजमिनी विक्रीच्या वादातून घरातच उशीने तोंड दाबून व गळा दाबून बापू गाढवे यांचा खून केल्याची व त्यांचा मृतदेह घराजवळ डिझेल टाकून जाळून टाकल्याची कबुली दिली व या गुन्ह्यात, आकाश बापू गाढवे, त्याची पत्नी पायल उर्फ आकांक्षा आकाश गाढवे व आणखी दोन साथीदार सहभागी असल्याची माहिती दिली.
तपासादरम्यान आणखी एक धक्कादायक बाब समोर आली. आरोपी सुनिल रामदास राठोड याने शितल लिंबाजी सोंगेवाड (रा. महातपुरी, गंगाखेड, परभणी) हिच्यासोबत प्रेमसंबंध असल्याचे सांगितले. ती गुन्हा दाखल करण्याची धमकी देत असल्याने १६ नोव्हेंबर २०२५ रोजी तिचा खून करून मृतदेह बाळापूर परिसरात अर्धवट जाळल्याची कबुली दिली.
यासंदर्भात मिरजगाव (कर्जत) पोलीस ठाण्यात ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यातील जावई सुनील राठोड, मुलगा आकाश गाढवे व सून पायल उर्फ आकांक्षा गाढवे या तिघांना अटक करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक कबाडी यांनी दिली तर प्रेयसी खूनप्रकरणी बाळापुर (अकोला) पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली. फरार दोघा आरोपींचा शोध सुरू आहे.
